उपचारास टाळाटाळ करणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, August 5, 2021

उपचारास टाळाटाळ करणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी.

उपचारास टाळाटाळ करणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी.

विषारी सर्पदंश रुग्णाचा उपचार करण्यास जिल्हा रुग्णालयाची टाळाटाळ..

डॉक्टर म्हणजे देवदूत... नव्हेतर यमदूत!

श्री. विठ्ठल नरवडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना तक्रारीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘प्रत्येक नागरिकाला किमान दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आपले कर्तव्य आहे. भारतीय नागरिक या नात्याने चांगली आरोग्य सुविधा मिळणे हा माझा मुलभूत अधिकार आहे. आपण मला आरोग्य सेवा नाकारून ‘आरोग्य सेवा मिळविण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे.’ त्यामुळे नाईलाजाने  मला खाजगी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. मला औषधोपचारासाठी 19,241 रुपये तर रुग्णालयाच्या बिलापोटी 7,310 रुपये असे एकूण 26,551 रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे. माझी आर्थिकस्थिती ही हलाखीची व बेताची असल्याने ऐनवेळी उपचारासाठी नातेवाईकांकडून उसने स्वरुपात कर्जाऊ घेतले आहेत.’ जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेतील कर्मचारी- अधिकारी यांनी आडमुठेपणा करून कर्तव्य बजावणीत कसूर केला आहे. संबधितांवर आपण योग्य कार्यवाही करावी. या घटनेची नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे. संबधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आर्थिक नुकसान भरपाईपोटी 26,551 रुपये मिळावेत, अशी मागणी नरवडे यांनी केली आहे.॥ राजकुमार कटारिया ॥ कार्यकारी संपादक
अहमदनगर ः डॉक्टर म्हणजे खर्‍या अर्थाने देवदूत.. मग आपल्या शरीराचं दुखणं हमखास बरा करणारा तज्ञ.. डॉक्टर म्हणजे दिलासा.. मनाला उभारी.. जीवनाची नवी उमेद.. असह्य वेदनेतून हमखास सुटका करून आरोग्याची वाट सुलभ करणारा अवलिया म्हणजे डॉक्टर.. डॉक्टरांच्या या आदर्श प्रतिमेला गालबोट लावणारे शहरातील जिल्हा रुग्णालय प्रशासन मात्र रुग्णांना मरण यातना जिवंतपणी भोगायला लावतय. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणार्‍या नागरिकांसाठी शासनाने जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयाची स्थापना केली पण.. ‘घोणस’ या विषारी जातीच्या सर्पदंश झालेल्या टाकळी खातगाव मधील विठ्ठल सुखदेव नरवडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची गरज असताना कोरोनाच्या नावाखाली त्यांना खाजगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. नरवडे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी 26,551 रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागलाय. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर देवदूत नसून यमदूत असल्याचा आरोप नरवडे यांनी केला आहे. जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ पोखरणा, डॉ घुगरे यांनी उपचाराबाबत हलगर्जीपणा केला असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा नरवडे यांचे नातेवाईक महादेव गवळी यांनी ‘दै. नगरी दवंडी’शी बोलताना दिला आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री. नरवडे आपल्या घराजवळील शेतात गवत कापणीचे काम करत होते. त्यावेळी घोणस जातीच्या विषारी सापाने त्यांचा चावा घेतला. त्यावरील प्राथमिक उपचार घेण्यासाठी त्यांनी तत्काळ गावातील आरोग्य उपकेंद्रात धाव घेतली. मात्र, तेथील सुविधांचा अभाव लक्षात घेता तेथील रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय तेथील आरोग्य अधिकारी यांनी घेतला. श्री. नरवडे हे जिल्हा रुग्णालयात आले असता त्यांना ‘येथे कोरोनाचे रुग्ण असल्याने दाखल करून घेता येत नाही’ असे सांगून विखे हॉस्पिटलला जावे, अशी लेखी शिफारस करण्यात आली. मात्र, तिथेही आयसीयू बेड उपलब्ध नव्हते. तेथूनही त्यांना परत जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान ह्या प्रकाराची माहिती रुग्णाचे नातेवाईक महादेव गवळी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना फोनहून दिली. त्यावर डॉ. पोखरणा यांनी रुग्णालयात या, दाखल करून घेण्याची व्यवस्था करतो, असल्याचे सांगितले. मात्र, तरी देखील डॉ. घुगरे यांनी दाखल करून घेतांना ‘तुमची कोरोना चाचणी करून घ्या, तुमच्यासाठी स्वतंत्र वार्ड मिळणार नाही, कोरोना वार्डात उपचार घ्यावे लागतील. दरम्यान काही बरं - वाईट झालं तर त्याची जबाबदारी तुमची असेल, तसे लेखी हमीपत्र द्यावे लागेल’ अशी बतावणी करून नरवडे यांच्या मनात कोरोनाविषयीची भीती निर्माण केली. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले.  सर्पदंशाच्या उपचाराची औषधे ही बरीच महाग असल्याने आणि नरवडे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खाजगी हॉस्पिटलचे प्रिस्क्रिप्शन घेऊन त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातून ही औषधे मिळवीत, अशी विनंती केली. त्यावर ‘अशा पद्धतीने औषधे बाहेर देता येत नाहीत. तुम्हाला तर इथं दाखल व्हायला सांगितले होते. तुम्ही काय आम्हाला विचारून तिथे गेलात काय’ असे बेजाबदारपणे बोलून डॉ. घुगरे यांच्याकडून नातेवाईकांना काढून देण्यात आले.
या प्रकाराची श्री. विठ्ठल नरवडे यांनी 4 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल करून जिल्हा रुग्णालयात होणार्‍या गैरकारभाराकडे लक्ष वेधले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून सर्रासपणे रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला जात असल्याने अनेक गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, संबधित दोषी आढळून येणार्‍या अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  
कोरोनाचे कारण सांगून जिल्हा रुग्णालयातून सर्रासपणे रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा अजब सल्ला दिला जातोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाने प्रसुतीसह इतर रुग्ण दाखल करून घेण्याचे बंद केले आहे. त्यामुळे साधारण दीड वर्षांपासून कोरोनावगळता जिल्हा रुग्णालयात इतर रुग्णांना ‘नो एंट्री’ आहे. याचा प्रत्यय अनेकांना आला आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्हा रुग्णालयात इतर रुग्णांवर उपचार करण्यात येत नाहीत. नरवडे यांना साप चावला असला तरी तो गंभीर असा सर्पदंश नव्हता. प्राथमिक उपचार करून आम्ही त्यांना खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. नरवडे यांचे तक्रारीत तथ्य नाही जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना उपचारासाठी टाळाटाळ करतात, हा आरोप अनठायी आहे.
 - डॉ सुनील पोखरणा, जिल्हा शल्यचिकित्सक.

जिल्हा रुग्णालयात मला दाखल करून घेताना टाळाटाळ करताना सेवेतील अधिकारी डॉ. घुगरे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक वासिम शेख यांचा मोबाईल नंबर दिला. ‘त्यांच्याशी संपर्क करा, ते योजनेत बसवतील. खाजगी रुग्णालयात दाखल व्हा, मोफत उपचार होतील’ असे सांगितले. मात्र, शेख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘जर रुग्ण अति गंभीर स्थितीत असेल तरच योजनेत उपचार होतात, अन्यथा खाजगी रुग्णालयाच्या आकारणीप्रमाणे बील अदा करावे लागेल,’ या अटीवर खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला सर्पदंश झालेल्या रुग्णाला  तातडीने उपचार मिळणे गरजेचे आहे अशा परिस्थितीत योजनेत उपचार व्हावे म्हणून रुग्ण अति गंभीर परिस्थितीत जाण्याची वाट पहावी काय, वासिम शेख हे वेळेत फोन उचलत नाहीत. व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत, त्यांची चौकशी करण्यात यावी. आरोग्य योजनेत कायद्याचा धाक निर्माण करून वचक बसविण्याची गरज आहे.
 - विठ्ठल नरवडे, रा. टाकळी खातगाव

No comments:

Post a Comment