तीन पट घरपट्टी वाढविण्याच्या मनपा प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 10, 2021

तीन पट घरपट्टी वाढविण्याच्या मनपा प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध...

 तीन पट घरपट्टी वाढविण्याच्या मनपा प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध...

घरोघर जाऊन 1 लाख सह्यांची मोहीम राबविण्याचा काँग्रेसचा संकल्प.

उद्या सामाजिक संघटनांचे धरणे आंदोलन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पूर्ण मूल्यांकनाच्या आधारे मनपा प्रशासन गुरुवारी होणार्‍या महासभेत घरपट्टी तीन पटीने वाढविण्याचा प्रस्ताव सादर करणार आहे. 11 ऑगस्टला या अवास्तव करवाढी विरुद्ध शहराच्या अनेक संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया युथ फेडरेशन, पीस फौंडेशन, गजानन हाउसिंग सोसायटी, भारतीय जनसंसद, कामगार संघटना महासंघ, इकरा सोशल क्लब, इत्यादी उद्या 11.00 वाजता अहमदनगर महानगरपालिकेत धरणे आंदोलन करणार आहेत. तिप्पट करवाढीचा प्रस्ताव मागे न घेतल्यास कोरोनामुळे आधीच पिचलेल्या सामान्य नगरकरांना वेठीस धरण्यासाठी मनपा सत्ताधारी आणि शहराच्या लोकप्रतिनिधींच्या या तुघलकी प्रस्तावा विरोधात काँग्रेसच्या वतीने घरोघरी जात नगर शहरात 1 लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविणार असल्याची घोषणा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.
येत्या गुरुवारी मनपाच्या ऑनलाइन महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेमध्ये एक, दोन नव्हे तर तब्बल तिप्पट करवाढीचा घाट मनपाने घातला आहे. या विरोधात काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली असून करवाढीच्या मुद्द्यावरून नागरिकांच्या वतीने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सदर तिप्पट करवाढ रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.
नगर शहराच्या विकासासाठी एकत्र आल्याच्या वल्गना सातत्यानं शहरात काही पुढारी करत असतात. विकासासाठी नव्हे तर वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी एकत्र येणार्‍या या पुढार्‍यांनी स्वतःच्या राजकारणासाठी सर्वसामान्य नगरकरांना वेठीस धरण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या पुढार्यांचे कार्यकर्ते असणार्‍या ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठी मनपाकडे पैसे उरले नसल्यामुळे आता यांना करवाढ करून सामान्य नगरकरांच्या खिशातून पैसे काढत ठेकेदारांच्या घशात घालायचे असून यातून त्यांना टक्केवारी गोळा करायची आहे. काँग्रेसचा याला तीव्र विरोध असून मनपा पदाधिकारी, नगरसेवक आणि मनपा सत्तेचे नेतृत्व करणारे शहराचे आमदार यांनी तिप्पट करवाढीच्या प्रस्तावास विरोध करत तो रद्द करावा. अन्यथा या प्रस्तावास विरोध न करणार्‍या शहराचे आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवकांच्या दारावर नागरिकांच्या वतीने काँग्रेस निषेधाची पत्रके चिकटविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले आहे.
मनपाने तिप्पट करवाढीचा प्रस्ताव रद्द न केल्यास काँग्रेसच्या वतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये नागरिकांच्या बैठका घेऊन करवाढीला विरोध केला जाईल. मनपाच्या या तुघलकी निर्णयाविरोधात नागरिक, व्यापारी, उद्योजक यांच्यामध्ये जनजागृती केली जाईल. तसेच या बैठकांच्या माध्यमातून शहरातील एक लाख नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहीम राबविली जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
कर संकलन करून त्या माध्यमातून शहरातील नागरिकांना नागरी मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी ही मनपाची आहे. इतर नागरि सुविधा तर जाऊ द्या पण साधे रस्ते सुद्धा करू न शकणार्‍या आणि नगरकरांना खड्ड्यात घालणार्‍यांना वाढीव कर का द्यायचा, असा परखड सवाल काँग्रेसने सत्ताधार्‍यांना विचारला आहे. शहरातील जागरूक नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात उपस्थित राहून महानगरपालिकेच्या अवास्तव करवाढ हाणून पाडावी असे आवाहन माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, अशोक सब्बन, बहिरनाथ वाकळे, अनंत लोखंडे, अर्शद शेख, फिरोज शेख, कॉ. महेबुब सय्यद, दिपक शिरसाठ, विजय केदारे, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडवणीकर, संध्या मेढे, भारतीय न्यालपेल्ली आणि अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी केले आहे.
नगर शहरामध्ये मनपा सत्ताधारी आणि विरोधक एक झाले आहेत. मनपात आता विरोधक असणारे भाजप मागील अडीच वर्ष राष्ट्रवादी बरोबर सत्तेत होते. त्यावेळी मनपातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असणार्‍या शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद न देता ते राष्ट्रवादीने स्वतःकडे ठेवले होते. राष्ट्रवादीने सत्ता बदलाच्या चर्चेत भाजपाला विरोधी पक्षनेते पदाचा शब्द दिला असून शहरातील सोयरे-धायरे आता विरोधी पक्षनेते पदाचे नाव निश्चित करणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करीत ही सोयर्‍या-धायर्‍याची नुरा कुस्ती सुरू असल्याने आज काँग्रेस सोडून तिप्पट करवाढी विरोधात कोणताही प्रमुख पक्ष भूमिका घेत पुढे आलेला नाही. काँग्रेस हाच नगरकरांच्या हक्कांसाठी लढणारा आणि त्यांच्या मनातला खरा विरोधी पक्ष आहे. सामान्य नगरकरांचे करवाढ करून कंबरडे मोडले जात असताना शहराच्या आमदारांनी मात्र मूग गिळून गप्प बसणे पसंत केले आहे, अशी टीका जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली असून विरोधी पक्ष सत्ताधार्‍यां बरोबर असला तरी काँग्रेस मात्र सर्वसामान्य नागरिक आणि नगरकरांबरोबर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here