पारगाव च्या विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांचा पारगाव दौरा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 28, 2021

पारगाव च्या विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांचा पारगाव दौरा.

 पारगाव च्या विकास आराखड्यासाठी अधिकाऱ्यांचा पारगाव दौरा.

मंत्री अब्दुल सत्तार यांचे मार्गदर्शन व व्याख्याते गणेश शिंदे यांच्या पुढाकाराने पारगाव ची आदर्श गावाकडे वाटचाल.


नगरी दवंडी
नगर - तालुक्यातील पारगाव हे एक ऐतिहासिक गाव आहे. राज्याचे महसूल व ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी पारगाव दत्तक घेतले.विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत पारगाव चा विकास कृती आराखडा सादर करणे संदर्भात ग्रामविकास राज्यमंत्री यांनी प्रशासनाला निर्देश दिले.याच बैठकीच्या अनुषंगाने नुकतीच पारगाव येथे सर्व विभागांच्या खाते प्रमुखांनी पारगावला प्रत्यक्ष भेट देत विकास आराखडा तयार करण्या संदर्भात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गग्रामस्थांसोबत चर्चा केली. प्रांत अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार उमेश पाटील यांनी कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागातील शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांसमोर मांडल्या. गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी कृषी क्षेत्रात वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना उपलब्ध असल्याचे नमूद केले. महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर यांनी शासनाकडे आपल्यासाठी विविध योजना आहेतच परंतु नियमित वीज बिल भरणे वीज चोरी थांबवणे या गोष्टींकडेही आपण लक्ष द्यायला हवे असे मत व्यक्त केले. तालुका पोलिस उपनिरीक्षक दिलीप बोडके यांनी कायदा-सुव्यवस्था व गावात शांतता असावी यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सहकारी संस्था सहायक उपनिबंधक अल्ताफ शेख यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावातील आर्थिक प्रगती साधता येऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला.या प्रसंगी सर्वच विभाग प्रमुखांनी आपले विचार व्यक्त केले. 
व्याख्याते गणेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले.केवळ भौतिक सुविधा उभारून शास्वत विकास साधता येणार नाही त्या साठी आपण आपले वर्तन बदलायला हवे. निसर्ग समाज संस्कार अशा अनेक विषयांना स्पर्श करत त्यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांची मने जिंकली.
सरपंच मीनाक्षी शिंदे उपसरपंच ताराबाई भोसले, ग्रामपंचायत सदस्य महेश शिंदे, गणेश गुंड , सुप्रिया शिंदे, शोभा शिंदे, मूनाबी शेख,ग्रामविकास अधिकारी सचिन पवार, प्रसाद पवार, बाळासाहेब चव्हाण,बाळासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. सागर शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. तर अतुल शिंदे व तोसिफ शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment