नगर मर्चंट बँकेला 13 लाखांचा दंड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

नगर मर्चंट बँकेला 13 लाखांचा दंड.

 नगर मर्चंट बँकेला 13 लाखांचा दंड.

गैर व्यवस्थापन, बेकायदेशीर कर्ज वाटप भोवले...
50 वर्षे पूर्ण करीत असलेल्या बँकेवर रिझर्व्ह बँकेचा ठपक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बँक प्रशासनाने गैरव्यवस्थापन, 10 कोटी 25 लाख रुपयांचे बेकायदेशीर कर्ज वाटप रिझर्व बँके पासून लपविणे, शैक्षणिक पात्रता नसणार्‍या व्यक्तींची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक अशा गंभीर बाबींची दखल घेत अहमदनगर मर्चंट्स सहकारी बँकेला रिझर्व बँकेने 13 लाख रुपयांचा दंड केला आहे. स्थापनेची 50  वर्षे पूर्ण केलेल्या नगर मधील व्यापार्‍यांमध्ये लोकप्रिय असलेल्या मर्चंट बँकेला हे गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.
रिझर्व्ह बँकेचे मुख्य प्रबंधक योगेश दयाल यांनी प्रसिद्धी पत्रक प्रकाशित केले असून, यात अहमदनगर मर्चंटस सहकारी बँकेला 13 लाख रुपयांचा दंड करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. बँकींग रेग्युलेशन अ‍ॅक्ट 1949 च्या कलम 46 (4) (आय) व कलम 56सह कलम 47 ए (1) (सी) यानुसार रिझर्व्ह बँकेला असलेल्या अधिकारानुसार या दंडात्मक कारवाईचा आदेश देण्यात आल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. अहमदनगर मर्चंटस बँकेत घडलेल्या तब्बल सव्वा दहा कोटीच्या कर्ज घोटाळ्याची माहिती रिझर्व बँकेपासून लपविली म्हणून बँकेवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता होती. याबाबत बँकेला मागील जूनमध्येच 1 कोटी रुपये दंड का करण्यात येऊ नये, अशी नोटीस रिझर्व्ह बँकेने बजावली होती. त्यानुसार हा 13 लाखाचा दंड झाला आहे. दहा कोटीच्या बोगस कर्ज वितरणासह गैरव्यवस्थापन, मु़ख्य कार्यकारी अधिकारीपदी पात्रता नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती आदी मुद्यांवर हा दंड झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
31 मार्च 2019 रोजीच्या बँकेच्या आर्थिक स्थितीच्या तपासणीनंतर चुकीचे कर्जवाटप, गैर व्यवस्थापन, गैरनियुक्ती, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशांचे झाले नसलेले पालन आदींसह अन्य मुद्यांच्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने अहमदनगर मर्चंटस बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीबाबत बँकेने केलेला खुलासा तसेच सुनावणीच्यावेळी तोंडी दिलेले स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने अमान्य केले असून, बँकेला आर्थिक दंड करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार 13 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत बँकेचे अध्यक्ष अनिल पोखरणा यांच्याशी संपर्क साधल्यावर, याबाबत आपल्याला काही माहीत नाही. आजारपणामुळे काही दिवसांपासून पुुण्यात उपचार घेत आहे व उपाध्यक्ष बायड यांच्याकडे अधिकार सुपूर्द केले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, बँकेशी संबंधित काही अधिकृत सूत्रांकडून बँकेला आर्थिक दंड झाल्याचे सांगण्यात आले.
दहा कोटीचे बोगस कर्ज प्रकरण, गैरव्यवस्थापन व सुरेश कटारिया यांची पात्रता नसताना मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती या मुद्यांवर रिझर्व्ह बँकेने अहमदनगर मर्चंटस बँकेला 13 लाखाचा दंड केला आहे. हा दंड संचालक मंडळाकडून वसूल करून तो भरला जावा. बँकेचा एकही पैसा या दंडासाठी भरला जाऊ नये, पण तसे झाले नाही तर याविरोधात आम्ही रिझर्व्ह बँकेकडे व न्यायालयात दाद मागू, असा इशारा बँकेचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र चोपडा यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment