श्रमाला दातृत्वाची जोड, कर्जतमध्ये अनोखे अभियान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 22, 2021

श्रमाला दातृत्वाची जोड, कर्जतमध्ये अनोखे अभियान

 श्रमाला दातृत्वाची जोड, कर्जतमध्ये अनोखे अभियान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यामुळे कर्जतचे नाव एका विशिष्ठ उंचीवर पोहचले आहे. भविष्यात आणखी मोठे उद्दिष्ठ आपण गाठाल,  असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत येथील श्रमदानातून स्वच्छता या अनोख्या अभियानात श्रमाला दातृत्वाची जोड मिळत असून या माध्यमातून जोडल्या गेलेल्या स्वच्छता रथाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यात लागणारे हत्यारे व साहित्य ठेवण्यासाठी लागणारे वाहन पुणे येथील युवा उद्योजक राहुल मांढरे यांनी
सर्व सामाजिक संघटनांच्या मालकीचे करून दिले. कर्जत शहरात स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 व माझी वसुंधरा या स्पर्धेच्या निमित्ताने कर्जत शहरात काम करण्यासाठी काही संघटना पुढे आल्या व गेली तीन वर्षांपासून सुरू असलेला श्रमदानातुन सेवा या अभियानाला पुढे नेण्याचा चंग बांधला कोणत्याही संघटनांचे व्यक्तीचे नाव पुढे न करण्याचा मुख्य उद्देश ठेऊन या अभियानाला नाव पडले ’सर्व सामाजिक संघटना’ व सुरू झाले श्रमदानातून स्वच्छता, वृक्षारोपनाचे काम याकामात लागणारे खोरे, टिकाव, घमेले, दाताळे, पंजे, विळे, कुर्हाडी, बोर्ड, स्पीकर  व असे बरेच प्रकारचे साहित्य ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणी दररोज आणायचे व पुन्हा नेऊन ठेवायचे हे अत्यंत जिकरीचे काम होते, मात्र कर्जत मधील दानशूर व्यक्तिमत्व अभयशेठ बोरा जे स्वतः श्रमदानात सहभागी होते त्यांनी आपल्या व्यवसायात वापरली जाणारी इको गाडी या कामाला वापरायला दिली, पण दररोज सकाळी सर्व साहित्य गाडीत टाकणे व काम झाल्यावर पुन्हा गाडीतुन पुन्हा एखाद्या ठिकाणी ठेवणे हे खूपच अवघड व वेळकाढू काम होते शेवटी हे सर्व साहित्य या गाडीतच दिवसभर ठेवले जाऊ लागले, पुढे याच गाडीला आकर्षक चित्रानी सजविण्यात आले व बघता बघता हीच गाडी या अभियानाची अविभाज्य घटक बनली व तिचे नामकरण झाले स्वच्छता रथ,  प्रत्येक व्यक्ती घाम गाळत असताना या गाडीचा वाटाही तेवढाच मोठा होता दरम्यान अनेक दिवस ही गाडी अभयशेठ बोरा यांनी वापरायला दिल्यानंतर पुढील वर्षीच्या स्पर्धेच्या कामकाजासाठी नव्याने दुसरी गाडी पाहण्याचा प्रयत्न ही झाला मात्र अखेरीस हाच स्वच्छतारथ कायमस्वरूपी सर्व सामाजिक संघटनाना बहाल करण्या चा निर्णय झाला व त्यासाठी पुणे येथील उद्योजक राहुल मांढरे यांनी पुढाकार घेऊन त्याचे वतीने हे वाहन आ. रोहित पवार यांच्या हस्ते सर्व सामाजिक संघटनांच्या ताब्यात देण्यात आले, श्रमप्रेमी राहुल नवले यांनी सर्वांच्या वतीने याची चावी स्वीकारली,  293 व्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता नियमित श्रमदानानंतर गेली नऊ महिने हे वाहन उपलब्ध करून देणारे अभयशेठ बोरा व हे वाहन सामाजिक संघटनांना बहाल करणारे उद्योजक राहुल मांढरे यांचा फेटा बांधून आ. रोहित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, सर्व सामाजिक संघटनानी गेल्या 293 दिवसांपासून कर्जत शहर आणि परिसरात श्रमदानाच्या माध्यमातुन स्वच्छता, वृक्षारोपणासह पर्यावरणासाठी काम केले आहे. याचे फलित म्हणून राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून कर्जतची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
यात नगरपंचायतला दोन कोटी रुपयांचे बक्षीस ही मिळाले असून एक कोटी रुपये नगरपंचायतला वर्ग झाले आहे.आणि यापुढे आपण निश्चित मोठे उद्दिष्ठ गाठाल. आपल्या कार्यामुळे उद्योजक राहुल मांढरे यांनी आपल्याला कार्याला जे वाहन दिले आहे हा स्तुत्य उपक्रम आहे. यावेळी राहुल मांढरे म्हणाले की, कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना हे अनेक दिवसांपासून श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन करीत आहेत. हे कार्य निस्वार्थ भावनेने सुरू आहे. या कार्याला आपल्याकडून हातभार म्हणून हे वाहन सुपूर्द केले आहे, याप्रसंगी नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, यांच्यासह सर्व सामाजिक संघटनेचे सर्व श्रमप्रेमी शिलेदार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment