ज्यांना स्वतःच्या माणसांना वाचवता आले नाही ते सर्वसामान्यांचे जीव काय वाचवणार? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

ज्यांना स्वतःच्या माणसांना वाचवता आले नाही ते सर्वसामान्यांचे जीव काय वाचवणार?

ज्यांना स्वतःच्या माणसांना वाचवता आले नाही ते सर्वसामान्यांचे जीव काय वाचवणार?

मी बाप नव्हे तर जनतेचा सेवक; आमदार लंके यांचे माजी आमदार औटी यांना खणखणीत प्रतिउत्तर

शासकीय समित्यांवर शिवसेनेकडून बगलबच्च्यांची वर्णी
  तालुका पातळीवर शासकीय समित्यांवर शिवसेनेच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांबाबतही आमदार लंके यांनी चौफेर टीका केली.एका बाजूला लोकशाहीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे आपल्या बगलबच्च्यांना समित्यांची खिरापत वाटायची ही कसली लोकशाही. खर तर मी अश्या कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. मला तेवढा वेळही नाही. विचार चांगले असतील, वैचारिकता असेल, समोरची व्यक्ती सुसंस्कृत असेल तर त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे.भले ते विरोधक असले तरी चालतील अशी आपली धारणा असल्याचे आमदार लंके म्हणाले.

दुसर्‍याच्या खिशात हात घालणारांना
वाढदिवसाची कात्री भेट द्यायला हवी

  अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या माध्यमातून माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी मोठे काम उभे केले.दुसरीकडे काही पुढारी शिक्षण संस्थेत काय करतात हे सर्वांना माहीत आहे.शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करताना दुसर्‍याचे खिसे कापण्याचे काम करतात.’एक हात मदतीचा’ सांगत दुसर्‍याच्या खिशात हात घालतात.अश्या पुढार्‍याला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून कात्री भेट द्यायला हवी असा उपरोधिक टोला आमदार नीलेश लंके यांनी लगावला.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः
मी बाप नव्हे तर जनतेचा सेवक आहे.समाजकारणात,राजकारणात आल्यापासून मी माझे जीवन जनतेसाठी अर्पण केले आहे.ज्या दिवशी मी स्वतःला आमदार समजेल त्यावेळी माझी जनतेसोबत असलेली नाळ तुटेल असे खणखणीत प्रतीउत्तर आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांना दिले.तालुक्यातील विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी माजी आमदार औटी यांनी मी सर्वांचा बाप असल्याची दर्पोक्ती केली होती.आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार औटी यांच्या दर्पोक्तीचा चांगलाच समाचार घेतला.
ज्यांना स्वतःच्या माणसांना करोना संकटात वाचवता आले नाही ते सर्वसामान्यांचे जीव काय वाचवणार असा सवाल आमदार नीलेश लंके यांनी उपस्थित केला. पंचायत समितीचे माजी सभापती राहूल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील करंदी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार लंके बोलत होते.गेल्या आठवड्यात माजी आमदार विजय औटी यांनी आमदार लंके यांच्या कार्यपद्धतीवर घणाघाती टीका करीत आपण आमदार असतो तर,करोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंपैकी किमान 50 टक्के जीव वाचवले असते असा दावा केला होता.
माजी आमदार औटी यांनी केलेल्या टिकेला आमदार लंके यांनीही रविवारी प्रथमच त्यांचे नाव न घेता खरमरीत उत्तर दिले.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राहूल झावरे यांच्यासह आत्मा समितीचे अध्यक्ष राहुल झावरे, उद्योजक मारुती रेपाळे, सरपंच नामदेव ठाणगे, किरण ठुबे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब ठाणगे, प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख जितेश सरडे, टाकळी ढोकेश्वर चे सरपंच बाळासाहेब खिलारी,  उपसरपंच सुनील चव्हाण वीज वितरण सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रभान ठुबे, अभयसिंह नांगरे, संदीप चौधरी, सत्यम निमसे, लखन ठाणगे शरद गोरे, महेंद्र गायकवाड, शारदाताई गांगड, सोनाली चौधरी, मंगल चौधरी, मनिषा ठाणगे, जितेंद्र उघडे, सुनिता औटी, सुनिल ठाणगे, भाऊसाहेब पिंपरकर आदी उपस्थित होते.
आमदार लंके म्हणाले की,करोना संकटकाळात जे सहा महिने बिळात लपून बसले होते ते काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही.माझा पींड काम करण्याचा आहे.मी कामातच राम मानणारा आहे.करोना संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये उभारलेल्या कोवीड उपचार केंद्रात तब्बल 17 हजार 100 रुग्ण करोनामुक्त झाले.प्रत्येकी 1 लाख रुपये खर्च आला असता असे गृहीत धरले तरी तालुक्यातील सर्वसामान्यांचे  अब्जावधी रुपये वाचले.ज्यांना स्वतःच्या जवळच्या माणसांना वाचवता आले नाही ते दुसर्‍यांना काय वाचवणार असा उपरोधिक सवाल करतानाच माजी आमदार औटी यांनी केलेल्या टिकेचा आमदार लंके यांनी खरपूस समाचार घेतला.
गेल्या दीड वर्षाच्या काळात मतदारसंघातील विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला.आजही 100 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे कार्यारंभ आदेश माझ्या हातात आहेत.नारळ फोडायला आणि भूमीपूजने करायला मला वेळ नाही.ज्यांना नारळ फोडायची हौस आहे त्यांनी खुशाल नारळ फोडावेत असे आमदार लंके म्हणाले.
मी राजकारणात आल्यापासून प्रस्थापितांनी मला कधीच स्विकारले नाही.माझ्या वाट्याला कायम संघर्ष आला.या पार्श्र्वभूमीवर माजी आमदार नंदकुमार झावरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.कारण त्यांनीही प्रतिकुल परिस्थितीचा सामना केला आहे.प्रस्थापितांविरूध्द संघर्ष केला आहे. माजी आमदार झावरे यांनी तालुक्यात,सहकार, शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम उभे केले.सर्वसामान्य, शेतकरी,वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांची तळमळ आजही कायम आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माजी सभापती राहुल झावरे काम करीत असल्याचे आमदार लंके म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मोठे शैक्षणिक काम उभे केले.अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माध्यमातून माजी आमदार झावरे यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक पिढ्या घडवल्या.सुमारे एक लाख विद्यार्थ्यांचे पालकत्व माजी आमदार झावरे यांनी संस्थेच्या माध्यमातून स्विकारले असल्याचे गौरवोद्गार आमदार लंके यांनी काढले.

No comments:

Post a Comment