कॉ. न्यालपेल्ली विडी कामगार व सर्वसामान्यांच्या हितासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत लढले- कॉ. बाबा आरगडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

कॉ. न्यालपेल्ली विडी कामगार व सर्वसामान्यांच्या हितासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत लढले- कॉ. बाबा आरगडे

 कॉ. न्यालपेल्ली विडी कामगार व सर्वसामान्यांच्या हितासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत लढले- कॉ. बाबा आरगडे

विडी कामगार नेते कॉ. न्यालपेल्ली यांचा स्मृती दिवस वृक्षरोपणाने साजरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कॉ. न्यालपेल्ली विडी कामगार व सर्वसामान्यांच्या हितासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत लढले. विडी कामगारांच्या हितासाठी त्यांनी सरकार, भांडवलदारा विरोधात लढा दिला. कामगारांप्रती न्याय, हक्काचे व समतेचे विचार त्यांनी मांडले. कुटुंबाप्रमाणे विडी कामगार चळवळ चालवून सर्वसामान्य विडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले असल्याची भावना कॉ. बाबा आरगडे यांनी व्यक्त केली.
श्रमिक नगर येथे महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, भाकप व श्रमिक जनता हाऊसिंग सोसायटीच्या वतीने विडी कामगार नेते कॉ. शंकर न्यालपेल्ली यांचा स्मृती दिवस वृक्षरोपणाने साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात कॉ. आरगडे बोलत होते. याप्रसंगी भाकपचे राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, नगरसेवक मनोज दुल्लम, कॉ. महेबुब सय्यद, लाल बावटा विडी कामगार युनियनचे सचिव अ‍ॅड. सुधीर टोकेकर, कॉ. बन्सी सातपुते, कॉ. बहिरनाथ वाकळे, आर्किटेक अर्शद शेख, शंकर येमुल, कॉ. भारती न्यालपेल्ली, पार्वती न्यालपेल्ली, फिरोज शेख, विजय केदारे, आप्पासाहेब वाबळे, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडवणीकर आदींसह परिसरातील विडी कामगार महिला व भाकपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अ‍ॅड. सुधीर टोकेकर म्हणाले की, विडी कामगारांची चळवळ मोठ्या अडचणीतून जात आहे. कोरोना काळात विडी कामगारांच्या हाताला काम नसल्याने मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता. हा धंदा बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हा धंदा बंद झाल्यास महाराष्ट्रातील लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. विडी कामगारांचे जीवन सुसह्य करण्यासाठी संघटना कॉ. न्यालपेल्ली यांच्या विचाराने कार्य करीत असल्याचे सांगितले. कॉ. भारती न्यालपेल्ली यांनी विडी कामगार चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी कॉ. शंकर न्यालपेल्ली यांचा आदर्श व विचार समोर ठेऊन संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे स्पष्ट केले.
कॉ. सुभाष लांडे म्हणाले की, त्यागी वृत्तीने निष्ठा ठेऊन कॉ. न्यालपेल्ली यांनी प्रमाणिकपणे चळवळ चालवली. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरु केलेली ही चळवळ सदैव चालू राहण्यासाठी प्रयत्न केल्यास हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉ. बहिरनाथ वाकळे यांनी कामगारांप्रती आस्था ठेऊन काम करणार्यांसाठी कॉ. न्यालपेल्ली यांच्या नावाने पुढील वर्षापासून पुरस्कार देण्याचा ठराव मांडला. याला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. कॉ. महेबुब सय्यद म्हणाले की, विडी कामगारांना आपल्या न्याय, हक्कासाठी संघर्ष करण्याचे न्यालपेल्ली यांनी शिकवले. त्यांच्या लढ्यात बळ निर्माण करुन अनेक मागण्या शासन स्तरावर मार्गी लावण्यासाठी त्यांचा पुढाकार होता. हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे विचार दिशादर्शक असल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment