ज्ञानेश्वर नगर व संभाजी नगरचा पाणी प्रश्न सोडविण्याची अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

ज्ञानेश्वर नगर व संभाजी नगरचा पाणी प्रश्न सोडविण्याची अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

 ज्ञानेश्वर नगर व संभाजी नगरचा पाणी प्रश्न सोडविण्याची अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

अन्यथा नागरिकांसह महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  शहराच्या महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील ज्ञानेश्वर नगर व संभाजी नगर येथील मागील पाच महिन्यापासून प्रलंबीत असलेला नागरिकांचा पाणी प्रश्न त्वरीत सोडविण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मराठा महासंघाचे जिल्हा युवक अध्यक्ष अनिकेत कराळे यांनी मनपा आयुक्त यांना दिले आहे. आठ दिवसात सदर पाणी प्रश्न न सुटल्यास स्थानिक नागरिकांना घेऊन महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रभाग दोन मधील ज्ञानेश्वर नगर व संभाजी नगर या भागाला गेल्या मार्च महिन्यापासून पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. या भागात आठ-आठ दिवस पाणी सुटत नाही. जेव्हा पाणी येते, तेव्हा नळाला अत्यंत कमी दाबाने 15 ते 20 मिनिटे  पाणी राहते. काही घरांना तर गेल्या पाच महिन्यापासून पाणीच आलेले नाही. याबाबत नागरिकांनी वारंवार वॉलमन, इंजिनीयर ते महापालिकेच्या अधिकार्यांपर्यंत पाठपुरावा केला. नागरिकांचा पाणी प्रश्न सुटला नाही, तर त्यांना संबंधितांकडून आश्वासनांचा प्रसाद मिळाला. या आश्वासनांनी नागरिकांची पाण्याची तहान भागणार आहे का? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तर नागरिकांना पाणीच मिळत नसेल तर महापालिका वसुली केली जाणारी पाणीपट्टी नागरिकांना माफ करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.  
 पाणीपट्टी भरुन देखील नागरिकांना हक्काचे पाणी मिळत नसल्याने ज्ञानेश्वर नगर व संभाजी नगर येथील नागरिकांमध्ये महापालिका विरोधात असंतोष आहे. या भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जेथून सुरू होते, तिथुनच एका मोठ्या हॉस्पिटलला तीन मोठे नळ कनेक्शन देण्यात आले आहे. यामुळे पुढच्या भागाला पाणी येत नाही. जर त्या हॉस्पिटलला इतके मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज होती, तर त्यांना स्वतंत्र पाईपलाईन देणे आवश्यक होती. सदर विषयाबाबत महापालिकेने गांभीर्याने लक्ष घालून पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment