आण्णा हजारेंच्या पत्राने पारनेर तालुका सैनिक बँक चौकशीच्या फेर्‍यात! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

आण्णा हजारेंच्या पत्राने पारनेर तालुका सैनिक बँक चौकशीच्या फेर्‍यात!

 आण्णा हजारेंच्या पत्राने पारनेर तालुका सैनिक बँक चौकशीच्या फेर्‍यात!

सहकार आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश; विभागीय सहनिबंधक आर.सी.शाह यांच्या अहवालाची प्रतिक्षा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची लेखी तक्रार या बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती, त्यानुसार सैनिक बँकेच्या संपूर्ण गैरकारभाराची चौकशी पूर्ण होत आली आहे. यासाठी सहकार विभागाचे पथक बँकेत सुमारे 25 दिवसांपासून तळ ठोकून होते. आता चौकशीत काय निष्पन्न होते? याची उत्सुकता सभासदांना लागली आहे.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे गेली पाच वर्ष विनायक गोस्वामी, बाळासाहेब नरसाळे, कॅप्टन विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, संपत शिरसाठ व विद्यमान संचालक सुदाम कोथिंबीरे यांनी सहकार विभागाकडे दिले होते व तपासणी व्हावी अशी मागणीही केली होती. मात्र सहकार विभाग ठोस निर्णय घेत नव्हते. शेवटी वरील तक्रारदारानीं सदर फाईल या बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे दिली. हजारे यांनी  अभ्यास करून खात्री झाल्यावर सहकार आयुक्तांना लेखी पत्र पाठवून सैनिक बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली.
सहकार आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात की, आपणही निवृत्त सैनिक आहे. तालुक्यातील इतर सैनिकांनी आग्रह केल्यानंतर सातारा जिल्हयातील सैनिक बँकेप्रमाणेच पारनेर तालुक्यातही सैनिक बँकेची स्थापना करावी असा आग्रह आपणाकडे धरला. ही संकल्पना आपल्याला आवडल्यानंतर आपण भारतीय रिझर्व बँकेकडे पाठपुरावा केल्यानंतर सन 1996 साली या सैनिक बँकेला परवाना मिळाला. या बँकेचे संस्थापक अध्यक्ष आपण असल्यामुळे बँकेला ठेवी जमा झाल्या. परंतु आपणास कोणतीही निवडणूक लढवायची नसल्याने पाच वर्षांनंतर अध्यक्षपदावरून दूर झालो व बँकेच्या अध्यक्ष, संचालकपदाची धुरा इतर माजी सैनिकांकडे सोपवली. या बँकेला उज्वल भविष्य लाभावे ही आपली संकल्पना होती मात्र, अलीकडच्या काळात या बँकेत भ्रष्टाचाराचा शिरकाव झाल्याचे पुरावे आपणाकडे आल्याने दुःख झाले आहे.
त्यानुसार सदर तक्रार अर्जाची स्वतंत्र चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी  विभागीय सहनिबंधक आर.सी.शाह यांना दिले. आर.सी. शाह यांच्यासह जवळपास दहा अधिकारी व कर्मचार्यांचे पथक गेल्या 25 दिवसांपासून सैनिक बँकेतील गैरकारभाराची व भ्रष्टाचाराची चौकशी करत असून लवकरच ते सहकार आयुक्तांना आपला अहवाल सादर करणार आहेत.

चौकशीतून गैरव्यवहार बाहेर येईल
  सैनिक बँक ही माजी सैनिकांच्या त्यागातून उभी राहिलेली आहे. मात्र गेली 10 वर्ष संचालकांनी आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता एकाच्या हाती कारभार सोपवला व नामधारी राहिले. परिणामी बँकेत भ्रष्टाचाराचा शिरकाव झाला. आता सहकार विभागाच्या चौकशीतून बँकेत केलेला गैरव्यवहार, भ्रष्टाचार बाहेर येईल व त्यात दोषीं असणार्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.
- विनायक गोस्वामी (सैनिक बँक, सभासद)

No comments:

Post a Comment