वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोविड सुसंगत वर्तणूक आवश्यक : डॉ. भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोविड सुसंगत वर्तणूक आवश्यक : डॉ. भोसले

 वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोविड सुसंगत वर्तणूक आवश्यक : डॉ. भोसले


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात पुन्हा एकदा काही भागात रुग्णसंख्या वेगाने वाढतानाचे चित्र दिसत आहे. प्रशासनाने आवाहन करुनही काही नागरिक कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करताना दिसत नाहीत. यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. विशेषता शनिवार-रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. वास्तविक आठवड्याच्या शेवटच्या दोन्हीही दिवशी जिल्हयात अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. तालुकास्तरीय यंत्रणांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्ती आणि आस्थापनांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात तालुकास्तरावरुन कऱण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी रोहिणी नर्‍हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखऱणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, काही तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे या तालुक्यांतील रुग्ण संख्या आढळून आलेल्या गावांमध्ये तातडीने आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करुन लक्षणे आढळणार्‍या रुग्णांची चाचणी करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे असे प्रकार आढळल्यास तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विशेषता गावांमध्ये ही रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. ही चिंतेची बाब आहे. गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी तसेच तलाठी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, सरपंच आणि इतर पदाधिकारी यांनी गावात कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम होता कामा नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवार-रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी नागरिक पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी गर्दी करीत आहेत. वास्तविक कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन सर्वांकडून होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर लग्नसमारंभ अथवा इतर सोहळ्याच्या ठिकाणी नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले तर संसर्ग वाढण्यास वेळ लागणार नाही. सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी आपल्याला वेळेवर त्याला नियंत्रित करावयाचे आहे. यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन केले जाईल याबाबत सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जास्त रुग्णसंख्या आढळून येत असलेला परिसर प्रतिबंधित करणे, लक्षणे आढळून येत असलेल्या व्यक्तींच्या चाचण्या कऱणे आणि कोविड सुसंगत वर्तणूकीची काटेकोर अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी कार्यवाही करावी. तालुकास्तरीय यंत्रणांनी आता अधिक गतीने कार्यवाही करणे आवश्यक आहे, सध्या ज्या भागात अशा कारवाया कमी झालेल्या दिसत आहेत. तेथेच रुग्णसंख्या वाढतानाचे चित्र आहे. त्यामुळे याबाबत सर्व यंत्रणांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍.या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करावी असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment