ऐन पावसाळ्यात कुकडी नदी कोरडी! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 29, 2021

ऐन पावसाळ्यात कुकडी नदी कोरडी!

 ऐन पावसाळ्यात कुकडी नदी कोरडी!नगरी दवंडी

पारनेर  प्रतिनिधी 

 राज्यात एकीकडे शेतातील पीके पाण्यात डुंबून चाललेल्या, डोंगर ढासळलेल्या, धरणे भरून गेलेल्या आणि ओढे, नद्या-नाले तुटुंब भरुन वाहत असलेल्या बातम्या ऐकायला मिळत असताना, बेट भागातील  परिसरात खरीप पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

      कुकडी नदी तीरावर असलेल्या माळवाडी, जांबूत, शरदवाडी, वडनेर बुद्रुक, वडनेर खुर्द, मोरवाडी,कुंड परिसर,निघोज या गावांमध्ये विहिरीच्या आणि नदीच्या पाण्यावर जगवलेली पिके पाण्याअभावी सुकत आहेत. परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील भासू लागली आहे. ऊस, सोयाबीन, बाजरी, मुग, ताग, भुईमूग, जनावरांचा चारा (मका, घास, ज्वारी) इ. पिके मोठ्या क्षेत्रावर असून येत्या १०-१५ दिवसांत नदीला पाणी आले नाही किंवा पाऊस झाला नाही तर खरीप पिके सोडून द्यावी लागणार आहेत. त्यामुळे कूकडी नदीला तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. या सर्व परिसरात पाउसाचे प्रमाण अतिशय अल्प असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे.निघोज सारख्या मोठ्या लोकवस्तीच्या गावात तर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.गाव व परिसरातील नळपाणी पुरवठा योजना पाण्याअभावी ठप्प झाली असून दोन ते दिवसांनी नळाला पाणी सोडण्यात येते.यासाठी कुकडी नदीला पाणी सोडताना गाव व परिसरातील पुष्पावती नदीला पाणी सोडण्यात आल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल.सध्या पावसाळा असूनही उन्हाचे चटके बसत आहेत.यामुळे खरीप पिकांवर याचा परिणाम झाला आहे. लवकरात लवकर कुकडी नदीला तसेच निघोज व परिसरातील पुष्पावती नदीला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी संबधीत ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी करीत आहेत.

No comments:

Post a Comment