विरोधी पक्षनेते पदासाठी कोतकरांकडून सह्यांची मोहीम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

विरोधी पक्षनेते पदासाठी कोतकरांकडून सह्यांची मोहीम

 विरोधी पक्षनेते पदासाठी कोतकरांकडून सह्यांची मोहीम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र महापौरांकडे मंगळवारी सुपुर्द केले. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी बुधवारी पाठिंब्यासाठी नगरसेवकांच्या सह्यांची मोहीम हाती घेतली असून, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांचे वरिष्ठांकडे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र महापौरांनी भाजपचे नगरसेवक तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिले होते. परंतु, भाजपच्या प्रदेशध्यक्षांनीच ही नियुक्ती थांबविण्याचा आदेश दिला.
याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी शुक्रवारी (दि. 16) नगरसेवक व पदाधिकार्‍यांची बैठक बोलविली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक महेंद्र गंधे, माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, गटनेत्या मालन ढोणे हे चोघे इच्छुक आहेत. गटनेत्या ढोणे यांनी प्रदेशध्यक्षांकडून नाव सुचविल्यानंतरच विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र महापौरांना सोमवारी दिले आहे. त्यानंतर मंगळवारी वाकळे यांनी नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र महापौरांकडे सुपुर्द केले. वाकळे यांचे सेनेबरोबरच राष्ट्रवादीशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे महापौरांनी वाकळे यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र दिल्याचे वृत्त आहे. मनपातील या नाट्यमय घडामोडींमुळे भाजपमधील इच्छुकही सावध झाले. त्यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त करत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. माजी सभापती मनोज कोतकर यांनी बुधवारी पाठिंब्यासाठी नगरसेवकांच्या सह्यांची मोहीम राबविली. अन्य नगरसेवकांशीही ते संपर्क करत आहेत. कोतकर हे राष्ट्रवादीकडून सभापती झाले होते. अवघ्या चार महिन्यांतच त्यांचे पद संपुष्टात आले. त्यासाठी माजी महापौर वाकळे यांनी स्थायी सदस्यांच्या निवडीसाठी सभा घेण्याची तत्परता दाखविली. तेव्हापासून कोतकर व वाकळे यांच्यात सुप्त संघर्ष आहे. तो विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करताना आणखी तीव्र झाला आहे.
महिला बालकल्याण समिती काँग्रेसला
महापालिकेत सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. शिवसेनेकडे महापौरपद व राष्ट्रवादीकडे उपमहापौरपद आहे. काँग्रेसला महिला बालकल्याण समिती देण्याबाबत आघाडीत एकमत झाले आहे. या पदासाठी काँग्रेसकडून रूपाली निखिल वारे व संध्या बाळासाहेब पवार यांच्या नावाची चर्चा आहे.
प्रदेशाचा निर्णय अंतिम
विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमधून काहींनी इच्छा व्यक्त केलेली आहे. पदासाठी इच्छा व्यक्त करणे काही गैर नाही. परंतु, पक्षाचा निर्णय अंतिम असतो. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी याबाबत बैठक बोलावली असून, पक्षाकडून जे नाव सुचविलेले जाईल. त्यांच्या नावाची शिफारस गटनेत्यांमार्फत केली जाईल, अशी माहिती भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment