मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्वस्तांवर कारवाई करण्याची आरपीआयची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्वस्तांवर कारवाई करण्याची आरपीआयची मागणी

 मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्वस्तांवर कारवाई करण्याची आरपीआयची मागणी

महार वतनाची 72 एकर जागा ट्रस्टने बळकावल्याचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मौजे अरणगाव (ता. नगर) येथे महार वतनची 72 एकर जागा अवैध रित्या बळकावून मागासवर्गीयांचे मानवी हक्क पायदळी तुडवून त्यांच्यावर अन्याय करणार्या अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्वस्तांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवकचे जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, जिल्हा सचिव मेहेर कांबळे, संतोष पाडळे, दानिश शेख, महेंद्र कांबळे, सुदर्शन कांबळे, सागर कांबळे, संगिता कांबळे, प्रमिला कांबळे, संगिता भिंगारदिवे, दिनेश पाडळे, अफाक शेख, गौतम कांबळे आदींसह अरणगाव येथील मागासवर्गीय समाज बांधव व महिला उपस्थित होते.
अरणगाव येथील मागासवर्गीय समाज व अवतार मेहेरबाबा ट्रस्ट मध्ये 72 एकर जागेचा वाद निर्माण झाला आहे. सदर जागा मागासवर्गीयांना महार वतनाखाली मिळाली असून, ट्रस्टच्या वतीने ती बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व्हे नं. 23, 24, 25 या जमिनीचा गट नं.27 अ/27 ब करुन महार वतनाच्या 72 एकर जागेवर मेहेरबाबा ट्रस्टने खोटी कागदपत्रे सादर करुन अवैधरित्या कब्जा केला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनला तक्रार केल्याने ट्रस्टचे विश्वस्त गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरुन या भागातील मागासवर्गीयांना धमकावण्याचा प्रकार सुरु केला आहे. मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त मागासवर्गीयांची जमीन लाटून त्यांच्या न्याय, हक्कावर गदा आनत आहे. ही जागा बळकावण्यासाठी मागासवर्गीयांचे शोषण केले जात असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे ही महार वतनची जागा मागासवर्गीयांच्या ताब्यात असून, ट्रस्टचा या जागेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर प्रश्न सहानूभुतीपुर्वक न सोडविल्यास संपुर्ण मागासवर्गीय समाज बांधवांसह रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment