बा विठ्ठला, कोरोनाला पळवून लाव. तुडुंब भरलेलं... आनंदी पंढरपूर, पुन्हा पाहायचंय... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

बा विठ्ठला, कोरोनाला पळवून लाव. तुडुंब भरलेलं... आनंदी पंढरपूर, पुन्हा पाहायचंय...

 बा विठ्ठला, कोरोनाला पळवून लाव. तुडुंब भरलेलं... आनंदी पंढरपूर, पुन्हा पाहायचंय...

मानाच्या वारकरी दाम्पत्यांची विठोबा रायाला प्रार्थना.
‘विठ्ठल-रुखुमाई’ची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा.


पंढरपूर - आज आषाढी एकादशी... आज विठू माऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभा दुमदुमून गेला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करताना “तुडुंब भरलेलं, आनंदी पंढरपूर पुन्हा पहायचंय.. ते वातावरण लवकर निर्माण होवो” अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली आहे. बा विठ्ठला, कोरोनाला पळवून लाव.. अशी आर्त प्रार्थना यंदाच्या वर्षी मानाचे वारकरी ठरलेले विणेकरी केशव व इंदूमती कोलते दाम्पत्यांन केली. आजच्या आषाढी एकादशीला लाखोंचा जनसमुदाय पंढरपुरात लोटलेल्या पंढरपुरकरांना वारकर्‍यांविना पंढरपुर नगरी सुनी सुनी वाटत आहे. प्रत्येक वर्षी वारकर्‍यांनी फुलून गेलेला मंदिर परिसर आज कोरोना प्रादुर्भावामुळे सुना वाटतोय.

दरवर्षी लाखो वारकर्‍यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आज पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून  विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोलते दाम्पत्याचा सत्कार केला गेला. केशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून 1972 पासून महिन्याची वारी करीत असत. गेल्या 20 वर्षापासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन रांगेतील भविकांतून मानाचा वारकरी निवडता येणे शक्य नसल्याने मंदिरात सेवा देणार्‍या भविकांतून ही निवड केली जाते. आपण केलेली सेवा फळाला आली आणि विठुरायाचे पूजा करण्याचे भाग्य मिळाले अशी भावना कोलते यांनी व्यक्त केली.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठुरायाच्या अतिशय आकर्षक 31 प्रकारच्या वॉटरप्रूफ प्रतिमांचा अनावरण सोहळा पार पडला. सध्या कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने विठ्ठल मंदिरही कुलूपबंद आहे. या वेळेचा सदुपयोग करीत मंदिर प्रशासनाने विठुरायाच्या अतिशय आकर्षक 31 प्रकारच्या प्रतिमा तयार करून घेतल्या आहे. लॉकडाऊन लांबला तर जगभरातील विठ्ठल भक्तांना या प्रतिमा ऑनलाईन विक्री करण्याची तयारीही मंदिर समितीने ठेवली आहे. दरम्यान, टाळ मृदुंगात ग्यानबा तुकारामचा गजर... रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या शिवशाही बस अशा वातावरणात मानाच्या दहा पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. कोरोना संकटामुळे केवळ मानाच्या दहा पालख्यांनाच पंढरपूरला जाण्याची मुभा देण्यात आलीय. त्यासाठी प्रत्येक पालखीसोहळ्यासोबत 40 वारकर्‍यांना परवानगी आहे. पण त्यांना कोरोना चाचणीची अट कायम ठेवण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, रुक्मिणी पालखी, संत एकनाथ महाराज, संत सोपानकाका, संत चांगावटेश्वर महाराज, संत निवृत्ती महाराज, संत निळोबा महाराज पालखी, संत मुक्ताबाई पालखी या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली  असून पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यभरात कोरोनाचं सावट पसरल्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी राज्य सरकारने पंढरपूरकडे जाणार्‍या वार्‍या आणि पालख्या यांच्यावर निर्बंध लावले आहेत. यंदाही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता पाहता राज्य सरकारने राज्यातील पायी वारी करण्यावर निर्बंध लावले आहेत, मात्र मानाच्या दहा पालख्यांना बसने पंढरपूरकडे जाण्याची परवानगी दिलेली आहे.
मानाच्या पालख्यानी एका पाठोपाठ पंढरपुरात प्रवेश केलाय. टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरात पालख्या आपापल्या मठांत पोचत आहेत. गेल्यावर्षा पेक्षा यावर्षी पोलीस प्रशासनाने वारकर्‍यांसाठी थोडी मुभा दिली आहे. दरवर्षीसारखा जरी जल्लोष होणार नसला तरी प्रत्येक पालखीसोबत यावर्षी 30 वारकर्‍यांना परवानगी देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने विसाव्यापासून मठापर्यंत पालख्यांना पायी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर प्रत्येक पालखीसोबत 30 वारकर्‍यांना सहभागी होण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दहा मानाच्या पालख्यांसोबत प्रत्येकी 30 असे एकूण 300 वारकर्‍यांना आता वारीत सहभागी होता येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल वारकर्‍यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

  मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते, जि. वर्धा (वय 71 वर्ष) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते सौ. इंदुमती केशव कोलते (वय 66 वर्ष) यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणार्‍या एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. आषाढी एकादशीनिमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभार्‍यामध्ये फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुलांनी रुक्मिणी मंदिराचं प्रवेशद्वार सजवण्यात आलं आहे. विठ्ठल मंदिराच्या गाभार्‍याची सजावट पंढर्‍या फुलांनी करण्यात आलीय. पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे.भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे...यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे...माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महापुजेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते म्हणाले. सध्याच्या करोना संकटामुळे यंदाची आषाढी मर्यादित स्वरुपात साजरी होत असल्याने बाहेरच्या कोणत्याही भाविकाला पंढरपुरात प्रवेश दिलेला नाही. मात्र आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमधील भाविकांनीही चंद्रभागेत स्नानाला जाऊ नये, यासाठी चंद्रभागेचे सर्व घाट लोखंडी बॅरेगेंटिंग लावून बंद करण्यात आल्याने आता चंद्रभागा बंदिस्त झाली आहे. चंद्रभागेत प्रवेश करणारे सर्व घाट आणि मार्गांवर लोखंडी बॅरेगेंटिंग लावून मोठा पोलिस बंदोबस्त या घाटांवर ठेवण्यात आला आहे. यामुळे शासनाने परवानगी दिलेल्या 10 मानाच्या पालखी सोहळ्यातील 400 वारकर्‍यांनाच केवळ चंद्रभागेत पादुका स्नानासाठी सोडण्यात आले. आषाढी एकादशीला या सर्व पादुकांना चंद्रभागेच्या पात्रता स्नान घालण्याची परंपरा आहे. तेवढ्याच वारकर्‍यांना चंद्रभागेपर्यंत जाता येणार आहे.

No comments:

Post a Comment