व्यापार्‍यांना दुकाने उघडण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

व्यापार्‍यांना दुकाने उघडण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी

 व्यापार्‍यांना दुकाने उघडण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी

काँग्रेस शिष्टमंडळाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मागील सलग दीड महिन्यांपासून संपूर्ण लॉकडाऊन सुरू आहे. तीन वेळा लॉकडाऊन प्रशासनाने केला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त असणारे नॉन इसेन्शियल गटामध्ये मोडणारे व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अत्यावश्यक सेवा सुविधा सुरू करण्याबरोबरच इतर व्यापाराला देखील सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप निचित यांची भेट काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली. यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाकडे काँग्रेसने मागणी करताना म्हटले आहे की, नगर शहरातील विविध व्यापारी संघटना, त्यांचे पदाधिकारी, प्रतिनिधी हे काँग्रेसच्या संपर्कात असून सदर व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने याबाबत काँग्रेसकडे विनंती केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाजार पूर्णतः ठप्प असल्यामुळे व्यापार्‍यांवर आर्थिक कुर्‍हाड कोसळली आहे.
यामुळे बँकांचे हप्ते थकने, त्याचबरोबर मालाचे नुकसान होणे, कर्मचार्‍यांचे पगार न करता येणे अनेक बाबींमध्ये व्यापार्‍यांचे नुकसान झाले आहे. किराणा दुकानदार भाजीवाले फेरीवाले यांना सुद्धा सध्या निर्बंधांमुळे मुभा देण्यात आली नाही नागरिकांची देखील ह्या सुविधा बंद असल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. या घटकांना देखील परवानगी देणे आवश्यक आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन निकषांप्रमाणे सध्या नगर शहरातील रुग्ण वाढीचा पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांच्या आत आहे. मात्र शासनाने या निकषा बरोबरच एकूण ऑक्सिजन बेड पैकी 40 टक्के बेड रिकामे असणे हा देखील निकष लागू केलेला आहे. या बाबतीमध्ये प्रशासनाकडून माहिती घेतली जात असून प्रशासनाच्या वतीने सर्व प्रमुख अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेऊन मागणीबाबत नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने काँग्रेस शिष्टमंडळला देण्यात आले आहे. नगर शहर हे मनपा कार्यक्षेत्रात आहे. त्याला स्वतंत्र आयुक्त आहेत. यामुळे मनपा आयुक्त आणि मनपा प्रशासनाने नगर शहरातील व्यापारी वर्गाला दिलासा देण्याच्या दृष्टीने सकारात्मकता दाखविणे गरजेचे आहे. त्यांनी या बाबतीमध्ये कुठलीही नकारात्मकता न ठेवता व्यापारीवर्ग त्याचबरोबर किराणा दुकानदार, भाजी व्यवसायिक यांच्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीचा माणुसकीच्या दृष्टीने विचार करावा आणि सकारात्मक अहवाल जिल्हा प्रशासनाला द्यावा. कोणाच्याही दबावाला बळी पडू नये. असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment