मुख्यमंत्र्यांसमोर निमगाव बुद्रुकच्या सरपंचांनी उलगडला कोरोनामुक्तीचा पट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

मुख्यमंत्र्यांसमोर निमगाव बुद्रुकच्या सरपंचांनी उलगडला कोरोनामुक्तीचा पट

 मुख्यमंत्र्यांसमोर निमगाव बुद्रुकच्या सरपंचांनी उलगडला कोरोनामुक्तीचा पट

निवडणूक बिनविरोध करत गावकर्‍यांनी केला कोरोना संकटाचा मुकाबला


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ’साहेब, कोरोनाचं संकट वाढत होत आणि गावात निवडणूक लागली. पण हे संकट ओळखून गावकर्‍यांनी निवडणूक बिनविरोध केली. कोरोनाच्या संकटाचा एकजुटीने सामना केला. गेल्या पंधरा दिवसापासून गावात एकही रुग्ण आढळून आला नाही. आता आम्ही गाव कोरोनामुक्त करणार आणि बक्षीसपण पटकावणार..’ अशा शब्दात अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव बुद्रुक (ता. संगमनेर) चे सरपंच प्रकाश कानवडे यांनी गावाने कोरोनामुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. त्यांच्या या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांनीही दाद दिली आणि आपल्याला सर्व महाराष्ट्र कोरोनामुक्त करायचा आहे. त्यासाठी प्रत्येक घर, वस्ती, गाव, शहर कोरोनामुक्त झाली पाहिजेत, असे सांगितले.

निमित्त होते. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील काही विभागातील सरपंचांशी साधलेल्या संवादाचे. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार ही सहभागी झाले होते.यामध्ये आज श्री. कानवडे यांना त्यांच्याशी थेट संवाद करण्याची संधी मिळाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पद्मश्री पोपटराव पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, राहाताचे गटविकास अधिकारी समृद्ध शेवाळे,  खडकेवाके (ता. राहाता) सरपंच सचिन मुरांदे, पोहेगाव (ता. कोपरगाव) सरपंच अमोल औताडे आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री महोदयांनी सुरुवातीला  नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला. त्यात  निमगाव बु.च्या सरपंच प्रकाश कानवडेंना प्रथम संधी मिळाली. त्यांनी गावाच्या कोरोनामुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची, त्यासाठी गावातील व्यक्तींनी, प्रशासनाने केलेल्या सहकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, ’कोरोनाचं संकट वाढत असतानाच गावची निवडणूक लागली. मात्र, गावकर्‍यांनी विचार करुन ही निवडणूक बिनविरोध केली. सरपंच निवडणूकही बिनविरोध झाली. त्यानंतर कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र आलो. माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत पथके स्थापन करुन सर्वेक्षण सुरु केले. दहा टीम करुन पन्नास कुटुंबांचे सर्वेक्षण करत होतो. संशयितांना जिल्हा परिषद शाळेत भरती केले. नंतर त्यांच्या चाचण्या करुन बाधित आलेल्या रुग्णांना लोकसहभागातून सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले. ज्या व्यक्ती त्या सेंटरमध्ये दाखल होण्यास कचरत होत्या त्यांना तालुक्याच्या गावी पाठवले. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सीसीटीव्ही बसवले. त्याचा चांगला परिणाम झाल्याची माहिती त्यांनी दिली.
गावात स्थापन केलेल्या पथकांनीही चांगले काम केले. आरोग्य समिती बरोबरच खासगी डॉक्टर्स, माध्यमिक आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मदतीला आले. सर्वांनी विनामुल्य सहभाग दिला. अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांचेही मोठे योगदान कोरोनामुक्ती मध्ये ठरल्याचे श्री. कानवडे यांनी सांगितले.  जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनातील सर्वांनी खूप सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही कोरोनामुक्तीसाठी प्रत्येक गावांना प्रोत्साहन दिले. राज्य शासनाने आता कोरोनामुक्त गावांसाठी स्पर्धा जाहीर केली आहे.  या स्पर्धेत निश्चितपणे सहभागी होऊन बक्षीसही मिळवू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. गावकर्‍यांच्या एकीमुळे आणि त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे  गेल्या पंधरा दिवसापासून गावात एकही बाधित रुग्ण नाही. हे वातावरण यापुढेही कायम ठेवू, असा विश्वासही प्रकाश कानवडे यांनी व्यक्त केला.
पद्मश्री पोपटराव पवार यांनीही यावेळेस सरपंचांना मार्गदर्शन केले. कोरोनामुक्त गाव ही केवळ स्पर्धा नव्हे तर चळवळ व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हिवरे बाजारने कोरोनाला हरवले. त्यासाठी गावातच विविध पथकांची स्थापना करुन प्रत्येकाला जबाबदारी सोपविली. प्रत्येकाने ती पार पाडली.  गावागावांनी त्यासाठी आता पुढे यायला हवे. हिवरे बाजारने केलेल्या या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यापूर्वीच घेतली. त्यातून कोरोनामुक्त गाव संकल्पना पुढे आली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संकल्पना समजावून घेतली. त्याची अंमलबजावणी आता संपूर्ण जिल्ह्यात होत असून 400 हून अधिक ग्रामपंचायती आणि पाचशेहून अधिक गावे कोरोनामुक्त झाली आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment