कोरोनाने देहदान चळवळीला ब्रेक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

कोरोनाने देहदान चळवळीला ब्रेक

 कोरोनाने देहदान चळवळीला ब्रेक

सामाजिक आणि सेवाभावी संस्थांनी केलेल्या जनजागृतीमुळे आपल्या देशात देहदानाची चळवळ जोर धरू लागली असतानाच कोरोनाने या चळवळीला ब्रेक लावला आहे. वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आपला देह मृत्यूपश्चात कामी यावा ही इच्छा बाळगून अनेकांनी देहदानाचा संकल्प केला होता. मात्र कोरोनाची महामारी आली आणि अनेकांचे हे स्वप्न अधुरे राहिले.  जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देहदान टाळण्याचा सूचना दिल्या आहेत त्यामुळे  राज्यासह देशातील सर्व वैद्यकीय  महाविद्यालयांनी देहदान स्वीकारणे बंद केले आहे. देहदानासारख्या अनमोल कार्यालाही कोरोनाने ब्रेक लावला आहे. कोरोनापूर्वी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना वर्षाकाठी 25 ते 30 मृतदेह अभ्यासासाठी मिळायचे कोरोनामुळे आज वैद्यकीय महाविद्यालयांना मृतदेह मिळेनासे झाले आहे.  सध्या वैद्यकीय महाविद्यालय सुरू नाहीत त्यामुळे ठीक आहे पण उद्या वैद्यकिय  महाविद्यालय सुरू झाल्यानंतर देखील हीच परिस्थिती कायम राहिली तर  विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल कसे घ्यायचे असा प्रश्न वैद्यकीय महाविद्यालयांना पडला आहेत. आपल्या देशात आधीच देहदानाविषयी म्हणावी तितकी जागृती झालेली नाही. मरणोत्तर नेत्रदान  करण्याबाबत लोक जितके उत्साही असतात तितके ते  देहदानाविषयी नसतात. देहदानाविषयी आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत त्यामुळे देहदानाचा संकल्प करणारे बोटावर मोजण्याइतकेच सापडतात. कधी देहदानाची प्रक्रिया कशी असते याच्या माहितीअभावी देहदान रखडले जाते तर संकल्प करुन ज्या रुग्णालयात अर्ज दाखल केलेला असतो, त्या शहराऐवजी मृत्यू झालेले ठिकाण दूर असल्याच्या कारणानेही देहदानाचा संकल्प प्रत्यक्षात उतरला जात नाही. आतातर कोरोना महामारी आली आहे. या महामारीने देहदान चळवळ पूर्णपणे थंडावली आहे. कोरोनाने देहदान चळवळीला ब्रेक लावल्याने वैद्यकीय महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांपुढे प्रॅक्टिकलचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पुढील काळातील गरज लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काही मृत शरीराची साठवणूक करण्यात आली आहे. मृत मानवी शरीरावर वैद्यकीय अभ्यास व संशोधन करण्यात येते. अनेक प्रकारचे संशोधन, अभ्यास व नवनवीन शस्त्रक्रियांसाठी मृत शरीराचा उपयोग होतो.  कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून देहदान बंद करण्यात आले. ते आणखी किती काळ बंद राहील हे सांगता येत नाही त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम वैद्यकीय अभ्यास व संशोधनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे, मो. 9922546295

No comments:

Post a Comment