सुप्रिया सुळे म्हणाल्या डॉ. रॅम्बो लंके ! तुफान आहे, जुनून आहे ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

सुप्रिया सुळे म्हणाल्या डॉ. रॅम्बो लंके ! तुफान आहे, जुनून आहे !

 सुप्रिया सुळे म्हणाल्या डॉ. रॅम्बो लंके ! तुफान आहे, जुनून आहे !

सुप्रिया सुळे यांनी साधला शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरातील रूग्णांशी संवाद

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः ’अडचणीच्या काळात ज्या पद्धतीने आ. नीलेश लंके व त्यांच्या सहकार्‍यांनी काम केले आहे हे महाराष्ट्र  नव्हे तर संपूर्ण भारत पाहतोय’. ’हे पाहताना माझ्या अंगावर काटा येतोय !’  ज्या कोव्हिडला पाहून लोक आपल्या घराच्या बाहेर पडत नाहीत, कुटूंबाला सोडून लोक पळून जात होते. त्यांचा अंत्यविधी करायलाही कोणी नव्हते. असे असताना नीलेश भाऊंनी जे काम केले आहे त्याला माझा मानाचा मुजरा ! त्यांना आता मी डॉ. रॅम्बो लंके असे संबोधणार आहे ! लोकप्रतिनिधी कसा असावा, एक भाऊ, एक अधिकाराचा, हक्काचा माणूस कसा असावा हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले असल्याचे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त खा. सुळे यांनी दुरसंवाद प्रणालीद्वारे भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरातील रूग्णांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आ. नीलेश लंके यांच्यावर कौतुकाचा अक्षरशः वर्षाव केला. खा. सुळे म्हणाल्या, आ. लंके यांनी केलेले काम भारताला अभिमान वाटावा असे आहे. कोव्हिडपासून संपूर्ण जग पळून जात होतं त्यावेळी आगीत उडी मारण्यासारखं काम नीलेशभाऊंनी केलं आहे. या कोव्हिड सेंटरमधील रूग्ण पांडूरंग आहेत. या पांडूरंगांची केलेली सेवा खूप कौतुकास्पद आहे. इथे आ. लंके यांनी खूप प्रेम आणि आशिर्वाद मिळाले आहेत ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. गेल्या काही दिवसांत एक आदर्श लोकप्रतिनिधी, एक आदर्श भाऊ, आदर्श मुलाच्या रूपाने आ. लंके यांनी काम केले आहे. त्याची नोंद पारनेरने घेतली, जिल्हयाने घेतली, राज्याने व देशानेही घेतली असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले.  मराठी, हिंदी, इंग्रजी या वृत्तवाहिन्यांवर आ. लंके यांचे काम दाखविण्यात आले. पत्रकारही वेडे झाले आहेत, कोण आहे नीलेश लंके अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नमुद करून यावेळी बोलताना खा. सुळे पुढे म्हणाल्या, एक कोव्हिड केअर सेंटर कसे असावे असे नियोजनबद्ध काम त्यांनी केले आहे. एमबीएची डीग्री घेतली की मॅनेजमेंट समजतं. लंके यांनी जे करून दाखवलंय ते व्यवस्थापन हॉवर्ड, सिंबॉयसिस, एमआयटीला जाऊन शिकावं लागत नाही. एखाद्या माणसाने ठरविले तर डिग्री नसली तरीही तो किती सुंदर मॅनेजमेंट करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.
सर्व बाबतीत आदर्श मात्र मास्क वापरण्यात नापास !
रूग्णांची सेवा करताना आ. लंके मास्क, पीपीई कीट, सोशल डिस्टन्स पाळत नसल्याबददल आपण अजितदादांकडे तक्रार केली होेती. त्यानंतर दादांनी फोन करून आ. लंके यांना झापले होते. ’का रे तु मास्क वापरत नाहीस ?’ अशी विचारणा करून दादांनी आ. लंकेवर चांगलीच फायरींग केल्याची आठवण खा. सुळे यांनी सांगितली. नीलेश भाऊ तुम्ही सातत्याने लोकांची सेवा करताय हे मला सांगायची गरज नाही. एकच हात जोडून विनंती करते नीलेश भाऊ मास्क घाला, हात धुवा, अंतर ठेवा. तुम्ही सगळयाच बाबतीत आदर्श आहात पण मास्क घालण्यात नापास आहात ! असा माझा आरोप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नीलेश भाऊ तुफान आहे, जुनून आहे !
नीलेश भाऊ तुफान आहे, जुनून आहे ! मला असं वाटतंय आपलं भाग्य आहे की आपल्या सगळयांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. हा राजकिय विषय नाही. नीलेश लंके राष्ट्रवादीचे आहेत असे म्हणणार नाही. हा महाराष्ट्राचा पुत्र आहे. ज्याचा मला व सगळयांना सार्थ अभिमान आहे. या सेंटरमध्ये जे रूग्ण आहेत, त्यांना मी रूग्ण म्हणणार नाही ते  देवाचे दुत आहेत. आपण सेवा करण्यासाठी ते इथं आले आहेत. या सेंटरला पवार साहेबांचे नाव देण्यात आलंय हे आमचं सगळयांचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं भाग्य आहे.
उधळलेल्या घोडयाला कोणी आवरण्याची हिंमत करणार नाही !
नीलेश भाऊंच्या कुटूंंबाचेही मी अभार माणते. त्यांनी आ. लंके यांना वाहूनच दिलंय. या माणसाला बोलून उपयोग नाही. त्यांनी त्यांना समाजकारणासाठी सोडूून दिलंय. हे पोरगं घरात काही करणार नाही. हा घरात असता तर काय झाले असते  ? आज नीलेश लंके प्रत्येक घरातील महाराष्ट्रातील एक पुत्र आहे. मला आनंद वाटतोय, नीलेश लंके यांना आवरणे अशक्य आहे. तो उधळलेला घोडा आहे. त्याला आवरण्याची हिंमत कोणी करणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ. लंकेंच्या कामाचं डॉक्युमेंटेशन व्हावं
आ. लंके हे अतिशय चांगले काम करीत आहेत. त्यांच्या सगळया अनुभवांचं डॉक्युमेंटेशन करण्याचा सल्ला खा. सुळे यांनी दिला. अनुभावाचं पुस्तक करावं, पॉडकास्ट करावेत हे महत्वाचं आहे. पुढच्या पिढयांसाठी असे काही उपक्रम करण्यासाठी या गोष्टींची नोंद घेतली पाहिजे. आपण काम खूप करतो मात्र डॉक्युमेंटेशन चांगलं करीत नाही. एक चांगली टिम पारनेरला पाठवा, जी सगळयाचं डॉक्युमेंटेशन करेल अशी सुचना सुळे यांनी स्वीय सहायक सतीश यांना केली.

No comments:

Post a Comment