वृक्ष लावा - पर्यावरण वाचवा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

वृक्ष लावा - पर्यावरण वाचवा

 वृक्ष लावा - पर्यावरण वाचवा


पाऊस आला आणि  पृथ्वी कशी न्हाऊन  निघाली . पहा तर काय किमया आहे या निसर्गामध्ये  . पावसातच नव्हे तर निसर्गातील प्रत्येक अणु-रेणू मध्ये ही किमया भरभरून पाहायला मिळते . पण हे बारीक सारीक निरीक्षण करायला वेळ आहे कोणाला ?

आपले पूर्वज निसर्गाला देव मानायचे . त्याचे कारण आपण कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही .कारण आपल्याला तशी केव्हा वेळच आली नाही . पण आज कोरोनासारखे संकट निर्माण झाले आणि सर्वांना निसर्ग देवतेचे  दायित्व  काय आहे ते समजले आहे . आपले पूर्वज पाऊस आला की,वाजत गाजत देवासारखे स्वागत करायचे. पावसाप्रती ऋण व्यक्त करायचे . धनधान्य ,सुबत्ता प्राप्त होते . निसर्ग आपले पालन पोषण करतो . जीवनावश्यक सर्व गोष्ट विनातक्रार पुरवतो , हे पूर्वज जाणत होते.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात निसर्गालाच मानव विसरून गेला आहे . आपल्या थोड्याशा फायद्यासाठी झाडावर कुर्‍हाडीचे घाव घालतो . निसर्गालाच उध्वस्त करू पाहतो . पण आज कोरोनाने निसर्गातील ऑक्सिजन  किती मूल्यवान आहे. या गोष्टीची  जाणीव प्रत्येक  व्यक्तीस झाली आहे .
निसर्गाशी प्रेमाचे नाते दृढ केल्याशिवाय उद्याचा सुर्योदय आनंदाने होणार नाही हे न समजण्याइतपत मानवाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का ? त्यासाठी नैसर्गिक गोष्टींच्या विध्वंसाचा विचार सोडून , आपली प्रगती निसर्गाच्या सानिध्यात आहे हे मानवाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे .
आपला  देश  महासत्तेच्या वाटेवर आहे .त्या दृष्टीने आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्नही केला जात आहे .पण पशुपक्षी, प्राणी, झाडे , वृक्ष - वेली नष्ट करून सिमेंटची जंगले उभारून देश महासत्ता आर्थिक दृष्ट्या  नक्कीच होईल .पण सजीवाला आवश्यक असणारा प्राणवायूच निसर्गात राहिला नाही तर ...
आर्थिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकास होणे आवश्यक त्यासाठी वनसंवर्धन, जलसंवर्धन, भू संवर्धन व पशुसंवर्धन म्हणजे संपूर्ण निसर्ग संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे स्वयंप्रेरणेने प्रत्येकाने करणे आवश्यक आहे .
आज जगामध्ये कोरोना शब्द उच्चारताच ऑक्सीजनची आठवण होते. नकळत प्रत्येकाला झाडाचे महत्वही उमजते. ऑक्सीजनसाठी देशालाच नव्हे तर जगाला देखील आटापिटा करावा लागला आहे . शासन तरी प्रत्येकाला किती सुविधा देणार ? त्यासाठी या क्षणापासूनच आपण सर्वांनी खडबडून जागे होणे आवश्यक आहे आणि झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आज माणूस मात्र निसर्गाशी किती कृतघ्नपणे वागतो आहे स्वतःच्या स्वार्थासाठी विज्ञानप्रेमी मानवाने जंगले उध्वस्त करून सामाजिक आरोग्य तर  बिघडवलेच आहे तसेच पर्यावरणाचा समतोलही ढासळला आहे . तसे पाहिले तर विज्ञान मानवाला वरदान नव्हे तर शाप ठरू पाहत आहे. मातीतील ओलावा जास्त झाडांची मुळे घट्ट पकडून ठेवतो तसे हवेतील ऑक्सिजन मानवाचे प्राण जपून ठेवतो त्यासाठी आपण  झाडे लावा पर्यावरण वाचवा असे मी म्हणणार नाही. तर पर्यावरणाला नव्हे तर स्वतःला वाचवा .
क्षणभरही ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही म्हणूनच एक तरी झाड लाव त्याला ओंजळभर पाणी घाल तो आयुष्यभर कामी येईल. तुम्ही झाडाला जीवदान दिले तर आपणास जगायला प्राणवायू देईल . आणि हे मानवा , हे विसरू नकोस की, वृक्षाला जीवदान दिले नाही तर तुझ्या सरणाला लाकडेही मिळणार नाहीत .
  निसर्ग संगती सदा घडो ॥
मंजुळ पक्षीगान कानी पडो ॥
कलंक प्रदुषणाचा झडो ॥
वृक्षतोड सर्वथा न आवडो ॥
सर्वांना पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
ज्योती भोर
 प्राथमिक शिक्षिका
9423389544

No comments:

Post a Comment