जिल्हयात सोमवार पासून लॉक डाऊन उठणार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

जिल्हयात सोमवार पासून लॉक डाऊन उठणार.

 जिल्हयात सोमवार पासून लॉक डाऊन उठणार.


नगरी दवंडी

अहमदनगर - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताना पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यातही घट होताना दिसत आहे. अशामध्ये आता राज्य सरकारकडून देखील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री लॉकडाऊनचे नियम शिथिल करणारी नवीन नियमावली जाहीर केली.

हे नवीन निर्बंध सोमवारपासून म्हणजे 7 जूनपासून लागू होणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबत आदेश काढला आहे.दरम्यान,नगर जिल्हयाचा पॉझिटिव्हीटी दर ४.३० तर २४.४८ ऑक्सिजन बेड भरलेले असल्याने सोमवारपासून जिल्हाही 'अनलॉक' होवू शकतो.मात्र जिल्हा प्रशासन याबाबत आदेश काढणार आहे.

दि.३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल वा कडक केले जाणार आहेत. एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक संदर्भात घोषणा केली होती. पण त्यानंतर काहीच तासात राज्य शासनाने खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे सरकारी गोंधळ समोर आला होता.

मात्र, अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली.मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील. याचा अर्थ तेथील महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन (ग्रामीण- मुंबई वगळता) हे नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढतील.

पाच टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्हीटी दर आहे आणि जिथे २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्यात येतील. हा पहिला स्तर मानला जाईल. पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी दर आहे आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड भरलेले आहेत ते दुसऱ्या स्तरात मोडतील. पाच ते दहा टक्के पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, असा तिसरा स्तर मानला जाईल. तेथील व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील.

दहा ते वीस टक्के पॉझिटीव्हीटी दर असेल आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील असा चौथा स्तर मानला जाईल आणि तेथे सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील. २० टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ७५ टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल.

पहिल्या स्तरात मोडणाऱ्या ठिकाणी मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल. दुसऱ्या स्तरातील ठिकाणी मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट राहील. तिसऱ्या स्तराच्या ठिकाणी दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. चौथ्या स्तरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील. पाचव्या स्तरातील ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. शनिवार, रविवारी ती बंद असतील.

No comments:

Post a Comment