उत्पन्नवाढीसाठी आत्मविश्वास वाढणे गरजेचे ः शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

उत्पन्नवाढीसाठी आत्मविश्वास वाढणे गरजेचे ः शेळके

 उत्पन्नवाढीसाठी आत्मविश्वास वाढणे गरजेचे ः शेळके

एक गाव-एक वाण मोहिमेंतर्गत खारेकर्जुनेत शेतकर्‍यांना बियाण्यांचे वितरण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शेतकरी जगाचा पोशिंदा असून, कोरोना काळात कारखानदारी बंद होती. परंतु एकमेव शेतकरीच काबाडकष्ट करून जगाला पोसत होता. त्यांना आयुष्यभर कष्टाशिवाय पर्याय नाही. तरीही कष्टाच्या तुलनेत त्याला मोबदला मिळत नाही. तरीही तो समाधानी आहे. शासनाच्या माध्यमातून शेतकर्यांची उन्नती व उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले जाताहेत. शेतकर्यांचे उत्पन्न वाढायचे असेल, तर त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. ’एक गाव - एक वाण’ या मोहिमेच्या माध्यमातून निश्चितच शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल, असे प्रतिपादन जि. प. उपाध्यक्ष प्रताप पा. शेळके यांनी केले.
खारेकर्जुने येथे कृषी विभागाच्या वतीने ‘एक गाव - एक वाण’ मोहिमेंतर्गत अजित-155 कापसाच्या बियाण्यांचे श्री. शेळके यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे, पं. स.चे उपसभापती डॉ. दिलीप पवार, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, सरपंच प्रभाकर मगर, उपसरपंच अंकुश शेळके, मंडल कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी, अजित सीडस्चे दीपक काशीद, जनार्दन निमसे, शिवाजी शेळके, बबन शेळके, राजू सय्यद, संभाजी पानसंबळ, यशवंत गाडेकर, अभिजीत डुकरे, सुविधा वाणी, नीता गिरी, कीटकर आदींसह गावातील शेतकरी उपस्थित होते.
श्री. शेळके पुढे म्हणाले की, या मोहिमेचा शेतकर्यांना निश्चितच फायदा होईल. मोहिमेंतर्गत गावातील शेतकर्यांची बैठक होऊन त्यात अजित 155 वाणाची सर्वानुमते निवड करण्यात आली. एक वाण वापरल्यामुळे पेरणी कशी करावी, औषधे कोणते फवारावे व कसे वापरावे याची माहिती मिळेल. त्याचा शेतकर्यांना फायदा होईल, असे ते म्हणाले.
प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे म्हणाले की, कापूस पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ‘एक गाव - एक वाण’ मोहिमेंतर्गत खारेकर्जुने येथे 66 शेतकर्यांना ‘अजित 155’ या कापूस बियाण्यांचे वाटप करण्यात आले. कपाशीच्या जैविक कीड नियंत्रणासाठी कपाशी पिकात पक्षी थांब्यासाठी ज्वारी वा मका पेरावा. त्यामुळे नैसर्गिक पक्षी थांबे तयार होतात व किड नियंत्रण होते. शेतात 1हेक्टरी 15 ते 20 फेरोमॅन सापळे लावावेत व सापळ्यात पडलेल्या पतंगांचे दररोज निरीक्षण घेऊन पतंग नष्ट करावे. पांढर्या माशीच्या नियंत्रणासाठी 125 दिवस झाल्यानंतर शेतात हेक्टरी 10 ते 12 पिवळे चिकट सापळे लावावेत. कपाशी पिकात आंतरपीक घ्यावे. त्यामुळे शेतकर्यांना त्याचा उत्पन्नवाढीसाठी फायदा होतो, असे ते म्हणाले
श्री. कापसे यांनी कपाशी पीक लागवड व विक्री व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. श्री. पवार, श्री. नवले, श्री. शेकडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विजय सोमवंशी यांनी केले, तर आभार उपसरपंच अंकुश शेळके यांनी मानले.

No comments:

Post a Comment