आ. रोहित पवारांनी पोलिस खात्याचे मनोधेर्य वाढवण्याचे काम केले- पो अधीक्षक मनोज पाटील - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 19, 2021

आ. रोहित पवारांनी पोलिस खात्याचे मनोधेर्य वाढवण्याचे काम केले- पो अधीक्षक मनोज पाटील

 आ. रोहित पवारांनी पोलिस खात्याचे मनोधेर्य वाढवण्याचे काम केले- पो अधीक्षक मनोज पाटीलनगरी दवंडी

कर्जत (प्रतिनिधी):-'आ. रोहित पवारांनी उपलब्ध करून दिलेल्या चेक पोस्टमुळे पोलिसांना ऊन, वारा, पावसात राहणे, काम करणे सोयीचे होणार आहे अशी पोलिसांची काळजी घेतली तर पोलिसांच्या मनात देखील समाजाप्रती काळजी घेण्याची इच्छा निर्माण होईल. कुणावर कुठे अन्याय झाला, अत्याचार झाला तर केवळ फिर्याद द्यावी पुढची सर्व जबाबदारी पोलीस पार पाडतील. पोलिसांना केवळ पोलीस कर्मचारी न म्हणता 'पोलिस अधिकारी' म्हणुन जो मान सन्मान दिला जाईल त्याची निश्चितच समाजाला चांगल्या कामातून परतफेड होईल. पोलिसांचे मनोधेर्य वाढवण्याचे काम आ. पवार यांनी केले आहे. जिल्ह्याचा पोलिस खात्याचा प्रमुख म्हणुन मी आभार व अभिनंदन व्यक्त करतो. पोलिसांची जेवढी काळजी घेतली आहे तेवढी जबाबदारी आणखी वाढली असून सर्वसामान्य जनतेची उत्कृष्ट सेवा करण्याची हमी देतो' असे मत पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केले.

आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून व सीएसआर फंडातून उपलब्ध करण्यात आलेल्या चेकपोस्ट अनावरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, प्रांताधिकारी अर्चना नष्टे,  कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, तहसीलदार नानासाहेब आगळे आदी उपस्थित होते.

आ. रोहित पवार म्हणाले,मतदारसंघात असलेल्या सर्वसामान्य जनतेची चांगली सेवा व्हावी यासाठी ही मदत आहे. न्याय देताना राजकारण न आणता पोलिसांनी सर्वसामान्यांची काळजी घ्यावी. पोलिसांनी सुरू केलेल्या अनेक यंत्रणा लोकांना न्याय मिळवून देत आहेत. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा राबवण्यासाठी पुढाकार घेतला. सर्वांच्या वतीने मी त्याचे आभार मानतो. यापुढेही अशी कोणतीही प्रभावी यंत्रणा राबवायची असेल तर त्यासाठी आमचा कर्जत जामखेड मतदारसंघ सर्वात पुढे असेल असा शब्द देतो असे म्हटले.

दि.१८ रोजी कर्जत येथे पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्यात चेक पोस्टचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सध्या चार चेकपोस्ट देण्यात आले असून आणखी चार लहान चेकपोस्ट  अशा एकूण आठ पोलिस चौक्यांचा यामध्ये सामावेश आहे. संबंधित भागासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची असलेली आवश्यकता व त्या भागात असलेले गुन्ह्यांचे प्रमाण आदींच्या आलेखावरून हे चेकपोस्ट ज्या-त्या ठिकाणी पोलिस यंत्रणेकडून स्थानबद्ध करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या अडचणी तसेच अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आ.रोहित पवारांचे हे महत्वपुर्ण पाऊल आहे. त्यांच्या या कल्पकतेने मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलत आहे.

           यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पो नी. चंद्रशेखर यादव यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे,  कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे, भास्कर भैलुमे, महिला आघाडीच्या मनीषा सोनमाळी, डॉ शबनम इनामदार, सोशल मीडियाचे दीपक यादव, सतीश पाटील, रज्जाक झारेकरी, सचिन धांडे, बाबा भिसे, पृथ्वीराज चव्हाण, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

         गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी विविध प्रभावी संकल्पना राबवून कर्जत व जामखेड मतदारसंघात सुरू असलेले पोलिसांचे काम नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरताना दिसत आहे. सध्या आ.पवारांच्या पुढाकारातून अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये पोलिस अधिकारीही स्वतःला झोकून देऊन हे उपक्रम यशस्वीरीत्या राबवून जनतेला न्याय मिळवून देत आहेत. त्यामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेसारख्या प्रभावी यंत्रणा नागरिकांना आधार देण्याचे काम करत आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेल्या 'भरोसा सेलमुळे' पिडितांना न्याय मिळत आहे. कर्जत व जामखेड शहराच्या रक्षणासाठी सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पातून अंदाजे ४९ स्थळांवर १२० कॅमेरे बसणार असुन गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष राहणार आहे. कर्जत-जामखेडची पोलीस यंत्रणा अधिक वेगवान होण्यासाठी गस्तीसाठी पोलिसांना चारचाकी दोन वाहने व चार दुचाकी वाहने देण्यात आली आहेत. कर्जत तालुक्यातील मिरजगाव व जामखेड तालुक्यातील खर्डा या ठिकाणीही नव्याने पोलीस ठाण्याची मंजूरी मिळाली असुन आता पोलिसांचे संख्याबळही वाढणार आहे. हे समाजाभिमुख कामे करत असताना पोलिस बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठीही आ.रोहित पवार कायम पुढेच आहेत. त्यांनी कर्जत-जामखेडच्या पोलिस बांधवांना राहण्यासाठी ७४ निवासस्थानांची अद्यावत पोलीस वसाहत मंजूर करून आणली आहे.सध्या कर्जत जामखेडमध्ये पोलिसांचे संख्याबळ हे दिडशेच्या घरात आहे त्यांना आपल्या हक्काचा निवारा मिळणार असुन हे कामही प्रगतीपथावर आहे.

            No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here