नगर तालुक्यात ’चाड्यावरची मूठ’ थांबली..पावसाने हाणली दांडी, बळीराजांच्या नजरा आभाळाकडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

नगर तालुक्यात ’चाड्यावरची मूठ’ थांबली..पावसाने हाणली दांडी, बळीराजांच्या नजरा आभाळाकडे

 नगर तालुक्यात ’चाड्यावरची मूठ’ थांबली..पावसाने हाणली दांडी, बळीराजांच्या नजरा आभाळाकडे


नगरी दवंडी/अविनाश निमसे
अहमदनगर ः नगर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दांडी हाणल्यामुळे शेतकर्‍यांची चाड्यावरची मूठ थांबली आहे. नगर तालुक्यात सुरुवातीला मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी करण्यास सुरुवात केली. मात्र तालुक्यात केवळ 20 टक्केच पेरण्या झाल्या. त्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. तर ज्यांनी मूग, बाजरी, कांदा आदी पिकांच्या पेरण्या केल्या आहेत त्यांच्यावर दुबार पेरणीचे सावट ओढवले आहे. त्यामुळे महागडे बी बियाणे व पेरणी चा खर्च वाया जातो की काय अशी भीती शेतकर्‍यां मध्ये निर्माण झाली आहे.
आजपर्यंत मान्सून पूर्व आणि मान्सून असा तालुक्यात 150 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अवघी 20 टक्के खरीप पेरणी झाली आहे. यामध्ये वाळकी मंडलात सर्वाधिक 148.4 मिमी पावसाची तर सर्वात कमी जेऊर मंडलात 40.4 मिमी पावसाची नोंद झाली.
मान्सून पूर्व पावसाने तालुक्यात हजेरी लावल्यानंतर लागलीच मान्सूननेही  तालुक्यात दमदार हजेरी लावली.
मान्सून वेळेवर दाखल झाल्याचा आनंद व्यक्त केला जात असतानाच  मागील आठवढया पासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खतासह मशागतीचा खर्च वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. आधीच कोरोना सारख्या भयानक महामारीने शेतकर्‍यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक शेतकर्‍यांना आपला माल विकता आला नाही. बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कांदा पीक शेतातच सडले. शेतातील भाजीपाला ही वायाला गेला. तोंडावर आलेला खरीप पेरायचा कसा असा यक्ष प्रश्न पडला. यातून हात उसणे घेऊन, कर्ज काढून कसे बसे सावरून खरीप पेरला तर आता पुन्हा आसमानी संकटाला सामोरे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लवकर पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी अटळ आहे. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. त्यामुळे बळीराजांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.

दोन-चार दिवस पेरणी थांबवा’
नगर तालुक्यात आजपर्यंत 150 मिमी पाऊस झाला आहे. परंतु सध्या  पाऊस लांबनीवर पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकर्‍यांनी कमी ओलीवर पेरण्याची घाई करू नये. कमी ओलीवर पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे दोन ते चार दिवस पेरणी थांबवावी.  बियाणे राखून ठेवावे. नंतर बियाणे उपलब्ध होण्यास अडचण येते.
   - पोपटराव नवले,
- कृषी अधिकारी, नगर तालुका

दोन-चार दिवस पेरणी थांबवा’
सुरुवातीचा पाऊस झाल्या नंतर यावर्षी मुग - बाजरीची पेरणी केली. नांगरणी, काकर्‍या-पाळी , पेरणी, खते, बी बियाणे यासाठी मोठया प्रमाणात खर्च झाला आहे. आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळ आल्यास आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
   - आसाराम वाघमोडे
- शेतकरी, साकतखुर्द

No comments:

Post a Comment