शशांक कुलकर्णी यांना कृषी धोरणांवरील संशोधनासाठी आंतराष्ट्रीय पुरस्कार जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

शशांक कुलकर्णी यांना कृषी धोरणांवरील संशोधनासाठी आंतराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

 शशांक कुलकर्णी यांना कृषी धोरणांवरील संशोधनासाठी आंतराष्ट्रीय पुरस्कार जाहीर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः  महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व कृषी अभियंता शशांक कुलकर्णी यांना 2020-21 चा आंतराष्ट्रीय युवा संशोधक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा महत्त्वपूर्ण पुरस्कार इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गनाइज्ड रिसर्च या जागतिक पातळीवर संशोधन व शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या प्रतिष्ठित संस्थेतर्फे दरवर्षी दिला जातो.
ही संस्था शिक्षण व संशोधन जागतिक पातळीवर सहज उपलब्ध आणि अधिक संयोजित होण्यासाठी कार्य करते. या संस्थेची मुख्यालये ऑस्ट्रेलिया मधील मेलबर्न व भारतामधील चंदिगढ येथे आहेत. या पुरस्काराच्या आयोजन समिती मध्ये 20 हून अधिक देशांचा समावेश करण्यात आला होता. पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ एस. एन. मेहता आणि संशोधन व विकास विभागाचे प्रमुख टी. सिंह यांनी शशांक कुलकर्णी यांना पत्राद्वारे कळवली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने 2015 साली ’शाश्वत विकास ध्येय ’ निर्धारित केली होती. या ध्येयांचा मुख्य उद्देश 2030 पर्यंत गरिबी निवारण, पृथ्वीचे रक्षण व जागतिक शांतता असे आहे. संयुक्त राष्ट्रांनी वैश्विक पातळीवर घोषित केलेल्या या ध्येयांच्या पूर्ततेसाठी सहाय्यभूत ठरणारे संशोधन करणार्‍या युवा संशोधकाला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. शशांक कुलकर्णी यांनी त्यांच्या संशोधनावर आधारित ‘स्वामिनाथन कमिशनः ए फाऊंडेशन ऑफ फार्मर पॉलिसीज इन इंडिया’ या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या कृषी आणि शेतकरी धोरणात विशेष योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुस्तकास भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रो. एम. एस. स्वामिनाथन यांची प्रस्तावना मिळालेली आहे. हे पुस्तक नवी दिल्ली येथील एकेडमिक फाउंडेशन या नामांकित प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. शशांक कुलकर्णी हे कृषी अभियंता आहेत. त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून कृषी अभियांत्रिकी या विषयात पदवी संपादित केली आहे. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील असून सध्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे सिनियर रिसर्च फेलो म्हणून जम्मू काश्मीर मधील जम्मू केंद्रीय विद्यापीठाच्या लोकनिती व लोकप्रशासन या विभागात गेली चार वर्षे भारताच्या शेती व शेतकरी धोरणांवर संशोधन करीत आहेत. यामध्ये राष्ट्रीय शेतकरी धोरण, स्वामिनाथन आयोग, विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या व त्यावरील शाश्वत धोरणात्मक उपाय यांसारख्या भारतीय शेती व शेतकरी यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांचा समावेश आहे. त्यांनी आतापर्यंत विविध विषयांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत एकूण दहा पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी सहा पुस्तके प्रकाशित झाली असून उर्वरित पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. तसेच विविध मानांकित जागतिक नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत त्याच बरोबर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. या पुरस्कारासाठी शशांक कुलकर्णी यांचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment