महत्त्वाकांक्षेची 22 वर्ष. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

महत्त्वाकांक्षेची 22 वर्ष.

 महत्त्वाकांक्षेची 22 वर्ष.

ना मुख्यमंत्री.. ना पंतप्रधानपद.


सो
निया गांधींच्या विदेशीचा मुद्दा धरून स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज 22 वर्षे पूर्ण झाले आहेत. या 22 वर्षात राष्ट्रवादीला स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळवता आलं नाही. काँग्रेसमध्ये राहून पंतप्रधानपद मिळू शकणार नाही हे ओळखून शरद पवार यांनी काँग्रेस पासून विभक्त होवून राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. तिसर्‍या आघाडीद्वारे पंतप्रधानपद मिळेल हे स्वप्नही पवारांचं कधी पूर्ण झालं नाही. पण महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादीचे स्थान अतिशय भक्कम आहे हाच राष्ट्रवादीचा मोठा आशावाद आहे.
2019 ला महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. वेगवेगळ्या विचारसरणीचे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारमधील एक महत्वाचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. आज या राष्ट्रवादी पक्षाला 22 वर्ष पुर्ण होत आहेत. 10 जून 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. आज या पक्षाचा वर्धापन दिन आहे. आज राष्ट्रवादी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ दावेदार असेल यात शंका नाही.
स्थापनेची 22 वर्षं पूर्ण करतांना ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे. 22 वर्षांच्या त्याच्या आयुष्यात हा पक्ष केवळ 5 वर्षं सत्तेबाहेर राहिला आहे. पण सत्तेचा त्यांचा अनुभव केवळ पक्षाच्या आयुष्यकाळात नाही आहे. संस्थापक शरद पवारांपासून या पक्षातले अनेक जण यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. काही अन्य पक्षांमध्ये होते. तेव्हा ते सत्तेत राहिलेले आहेत. सत्ता म्हणजे केवळ राज्य सरकार नव्हे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार संस्था, बाजार समित्या हीसुद्धा सत्ता आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडे, कार्यकर्त्यांकडे आणि त्यांच्या परिवारांकडे त्यांच्या त्यांच्या भागातली ही सत्तास्थानं अनेक वर्षं आहेत. सत्तेत असा आणि एवढा काळ वाटा असणारा काँग्रेसनंतर ’राष्ट्रवादी’ हाच दुसरा पक्ष असावा. या पक्षाच्या स्थापनेपासून महाराष्ट्राची सत्ता ’राष्ट्रवादी’मुळेच पूर्ण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एक निरिक्षण कायम नोंदवलं गेलं ते म्हणजे हा बहुतांशानं मराठा नेतृत्वाचा आणि मतदारांचा पक्ष आहे. ’राष्ट्रवादी’ची निर्मिती ही काँग्रेसमधून झाली आणि काँग्रेसचं ग्रामीण भागातून सहकाराच्या जाळ्यातून उभं राहिलेलं स्थानिक नेतृत्व हे मराठा समाजातून होतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये, मंत्र्यांमध्ये कायम मराठा समाजाला जास्त संधी दिलेली पहायला मिळते. शरद पवारांचं राजकारण हे नेहमी राजकीय बेरजेचं राहिलेलं असल्यानं अनेक ओबीसी, दलित आणि मुस्लिम समुदायातले नेतेही या पक्षातून वर आलेले पहायला मिळतात.
छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक ही त्यातली काही नावं. पण ही काही नावं वगळता बाकी नेते बहुतांशानं मराठा समाजातून येतात. केवळ नेतेच नाही तर राष्ट्रवादीचा मतदार हाही सर्वाधिक मराठाच आहे असंही कायम म्हटलं गेलं. 2014 च्या दोन्ही निवडणुका आणि 2019ची लोकसभा निवडणूक, या तिन्ही निवडणुकीत ’राष्ट्रवादी’च्या जागा कमी झाल्या याचं कारण मराठा मतदार त्यांच्यापासून दुरावला असं म्हटलं गेलं आणि त्याच वेळेस तो प्रामुख्यानं भाजपाकडे गेला त्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या असंही दिसलं.
राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण भागापुरता मर्यादित पक्ष आहे असं सतत या पक्षाबद्दल बोललं गेलं आणि 22 वर्षांनंतरही ती ओळख या पक्षाला बदलता आली नाही आहे.पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिक, सोलापूर अशा शहरांमध्ये आणि इतर महानरपालिकांमध्ये या पक्षाने ताकद निर्माण केली. पण तिथंही सत्ता कायम राहिली नाही. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदांवरचं त्यांचं वर्चस्व जास्त राहिलं. परिणामी ’राष्ट्रवादी’चा तोंडावळा ग्रामीणच राहिला. याचा एक परिणाम म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर काही ग्रामीण महाराष्ट्र हाच ’राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला राहिला. तिथं नुकसान झालं तेव्हा पक्ष सत्तेबाहेर गेला आणि या भागातला मतदार मागे उभे राहिला तेव्हा पक्ष सत्तेत आला. असं होण्याचं एक कारण म्हणजे काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीचंही राजकारण सहकार आणि साखरपट्ट्यावरच आधारलेलं आहे.
साधारण 20 वर्षांपूर्वी म्हणजे पक्षाची स्थापना होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी परदेशी वंशाच्या (इटालियन) आहेत म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व देण्यास विरोध केला होता. काँग्रेसचे नेतृत्व परदेशी नागरिकाकडे देऊ नये यासाठी शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत सोनिया गांधींचा विषय लावून धरला होता आणि थेट सोनिया गांधींनाच आव्हान दिले होते. यानंतर काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई करत शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिख अन्वर यांचे निलंबनही केले होते. काँग्रेसच्या निलंबनानंतर तात्काळ या तिघांनीही मे-जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी भारतीय समाजवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यात आले होते. शरद पवारांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध करताना त्यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, खरे कारण शरद पवार यांची महत्वाकांक्षा असल्याचेही त्यावेळी बोललं गेलं होतं. काँग्रेसचे अध्यक्षपद आपल्याकडे येणार नाही, असे लक्षात आल्यानंतरच पवारांनी उघडउघड बंडखोरी करुन सोनिया गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. हा मुद्दा उपस्थित करण्यात पवारांचे सहकारी तारिक अन्वर हे त्यावेळी आघाडीवर होते, असेही म्हटले गेले होते. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना करणार्‍या पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर या दोन्ही सदस्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्या मुद्द्यावर झाली, पुढे त्याच सोनिया गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्तेत भागीदारी केली. इतकंच नाही तर राज्यासह केंद्रातही राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. स्वतः शरद पवार काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री होते. त्यामुळे पवारांनी काँग्रेसशी फारकत घेत वेगळी चूल मांडली असली तरी त्याच पक्षांसोबत आजही ते सत्तेत आहेत.शरद पवार हे राज्याच्या राजकारणातलं सगळ्यात अनुभवी नेतृत्व म्हणुन ओळखलं जातं.परंतु राष्ट्रवादीसारखा पक्ष महाराष्ट्रात एकटा सत्तेत कधीच आला नाही आणि आजवर त्यांचा मुख्यमंत्रीही झाला नाही,त्यामुळे 22 वर्षांची राष्ट्रवादीच्या आगामी काळात या दोन महत्वकांक्षा पुर्ण होतात का हे पाहावं लागेल.

No comments:

Post a Comment