11 कर्मचार्‍यांच्या बदल्या! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 22, 2021

11 कर्मचार्‍यांच्या बदल्या!

 11 कर्मचार्‍यांच्या बदल्या!

वर्षानुवर्ष एकाच टेबलावर काम करणार्‍या एकाधिकार शाहीला मनपा आयुक्तांकडून लगाम.


अहमदनगर -
महापालिकेतील नगररचना बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, आस्थापना, यासह अन्य विभागातील कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच टेबलावर काम करत आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यांची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत असून, नागरिकांनाही छोट्या छोट्या कामांसाठी महापालिकेत अक्षरश: हेलपाटे मारावे लागतात. ज्येष्ठ नागरिकांसह सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनाही महापालिकेतील कर्मचार्‍यांबाबतच्या वाईट अनुभवांची दखल घेत मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी नगररचना विभागातील सहा व अन्य विभागातील पाच अशा 11 कर्मचार्‍यांच्या बदल्या करून वर्षानुवर्षे एकाच टेबलवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या एक अधिकार शाहीला लगाम घातला आहे.
मनपा आयुक्तांनी नगररचना विभागापासून काल बदल्यांना सुरुवात केली. नगररचनाचे सहायक संचालक राम चारठणकर यांच्यासह अधिकार्‍यांची आयुक्तांनी बैठक घेवून नगररचना विभागातील सहा कर्मचार्‍यांच्या बदल्यांच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करत तत्काळ हजर होण्याचा आदेश दिला आहे. झालेली बदली रद्द करण्याबाबत कुठलाही दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास महापालिका अधिनियम कलम 56 नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गोरे यांनी दिला आहे.
नगररचना विभागातील ट्रेसर सतीश दारकुंडे यांची नगररचना विभागातून बांधकाम विभागात बदली करण्यात आली आहे. लिपिक व टंकलेखक संजय चव्हाण यांची नगररचना विभागातून प्रभाग समिती क्रमांक- 4 मध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रभाग समिती क्रमांक चारमधील शिवराम गावांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लिपिक सुनील खलचे यांची नगररचना विभागातून सावेडी प्रभाग कार्यालयात बदली करण्यात आली आहे. खलचे यांच्या जागी सावेडी प्रभाग कार्यालयातील देवराम पिचड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लिपिक मोहन ढवळे यांची नगररचना विभागातून स्थानिक संस्था कर विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी स्थानिक संस्था कर विभागातील किशोर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लिपिक राजेंद्र फडतारे यांची नगररचना विभागातून प्रभाग समिती क्रमांक- 3 मध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रभाग समिती क्रमांक-3 मधील राहुल झिंजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिपाई राधा आहेर यांची नगररचना विभागातून माहिती सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी माहिती सुविधा केंद्रातील शिपाई पदावर कार्यरत असलेल्या उज्ज्वला महारपुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेतील वर्ग 3 आणि 4 मधील कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, आस्थापना, सामान्य प्रशासन आदी विभागांचा आढावा घेऊन कामाच्या सोयीनुसार बदल्या करण्यात येणार आहेत. बदल्या करताना कामकाज ठप्प होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment