कोरोनाच्या ड्युटीवर असलेल्या शिक्षकास तहसिलदाराकडून मारहाण प्रकरणाचा निषेध, मुख्यमंत्र्यांना निवेदन- बाबासाहेब बोडखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 6, 2021

कोरोनाच्या ड्युटीवर असलेल्या शिक्षकास तहसिलदाराकडून मारहाण प्रकरणाचा निषेध, मुख्यमंत्र्यांना निवेदन- बाबासाहेब बोडखे

 कोरोनाच्या ड्युटीवर असलेल्या शिक्षकास तहसिलदाराकडून मारहाण प्रकरणाचा निषेध, मुख्यमंत्र्यांना निवेदन- बाबासाहेब बोडखेनगरी दवंडी

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोना काळात कार्यरत असणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 50 लाखाचे विमाकवच लागू करावे व पाथरी (जि. परभणी) येथे चेक पोस्टवर कर्तव्य बजावणार्‍या शिक्षकास शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या तहसिलदारास बडतर्फ करुन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. कोरोनाकाळात सेवा देणार्‍या शिक्षकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

राज्यातील शिक्षकांना दि.2 मे पासून 14 जून पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. मात्र काही शिक्षकांना सुट्टी अगोदरपासूनच कोरोनाच्या वेगवेगळ्या कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांना शहर सोडून न जाण्याचे आदेशही काढण्यात आलेले आहेत. गेल्यावर्षापासूनच ग्रामपंचायत निवडणूकच्या मतदार याद्या तयार करण्यासोबतच इतर कामांसाठी जुंपले होते. त्यांना उन्हाळी सुट्टी मिळणे अपेक्षित आहे. तरी देखील शिक्षक या संकटात सेवा देऊन कर्तव्य बजावत आहे. यामध्ये अनेक शिक्षक कोरोना बाधित झाले आहेत. तर अनेकांचा जीव गेला असून, त्यांना भरपाई मिळाली नसल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. कोरोनाच्या ड्युटीवर असलेल्या पोलीस व शासनाच्या इतर कर्मचार्‍यांसाठी शासनाने 50 लाखांचे विमा सुरक्षा कवच लागू केलेले आहे. मात्र शिक्षकांना यामधून वगळण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 तसेच पायरी (जि. परभणी) येथील ढालेगाव चेक पोस्टवर शिक्षक बळीराम चव्हाण व गजमल हे 28 एप्रिल रोजी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कार्यरत होते. रात्री बारा वाजता पायरीचे नायब तहसीलदार कट्टे नशेच्या बेधुंद अवस्थेत गावगुंड असलेल्या वाळू माफियांसह चेकपोस्टवर आले. त्यांनी शिक्षक बळीराम यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना काठीने देखील जबर मारहाण केली असल्याचा आरोप करुन या घटनेचा महाराष्ट्रातील शिक्षकांच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. कोरोना काळात कार्यरत असणार्‍या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 50 लाखाचे विमाकवच लागू करावे, कोरोनाने बाधित झालेल्या शिक्षकांना आरोग्य सुविधा पुरवाव्या व पाथरी (जि. परभणी) येथे चेक पोस्टवर कर्तव्य बजावणार्‍या शिक्षकास शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या तहसिलदारास बडतर्फ करुन त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment