नाट्य परिषद शेवगाव शाखेच्यावतीने ज्येष्ठ कलावंत शाहिर शहाजी काळे यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

नाट्य परिषद शेवगाव शाखेच्यावतीने ज्येष्ठ कलावंत शाहिर शहाजी काळे यांचा सन्मान

 नाट्य परिषद शेवगाव शाखेच्यावतीने ज्येष्ठ कलावंत शाहिर शहाजी काळे यांचा सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्यावतीने ज्येष्ठ गायक व नाट्य चित्रपट अभिनेते शाहिर शहाजी काळे यांच्या 50 वर्षांच्या यशस्वी कला कारकीर्दीबद्दल, तसेच वयाची 75 वर्षे पूर्ण करीत असल्याबद्दल 27 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने मानपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती नाट्यपरिषदेच्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष उमेश घेवरीकर व उपाध्यक्ष भगवान राऊत यांनी दिली.
ज्येष्ठ शाहिर, गायक, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक शाहिर शहाजी काळे हे गुरुवार दि. 27 मे 2021 रोजी आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण करून 76 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या लोकरंगभूमी, रंगभूमी, छोटा पडदा, व्हिडीओ अल्बम व चित्रपट क्षेत्रातील 50 वर्षांच्या यशस्वी कला कारकीर्दीबद्दल मानपत्र देऊन त्यांचा ऑनलाईन पद्धतीने गौरव केला जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना महामारीचे संकट व टाळेबंदी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपाध्यक्ष भगवान राऊत व प्रमुख कार्यवाह प्रा. मफिज इनामदार यांनी सांगितले.
करवीर नगरी कोल्हापूर येथील मूळ रहिवासी असलेले शाहिर शहाजी काळे 1970 मध्ये ज्येष्ठ सिनेअभिनेत्री माया जाधव यांच्यासोबत आपली कला कारकीर्द घडविण्यासाठी मुंबईत दाखल झाले आणि 1970 ते 2020 या पन्नास वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी विविध ऑर्केस्ट्रा, लोककला विषयक कार्यक्रम, नाटके, मालिका, लावण्यांचे कार्यक्रम, व्हिडीओ अल्बम व मराठी चित्रपटसृष्टीत सहाय्यक अभिनेता व चरित्र अभिनेता, गायक, शाहीर म्हणून सलग 5 दशके यशस्वी कामगिरी केली.
शाहिर साबळे आणि पार्टी या शाहिरी कार्यक्रमातून माया जाधव आणि शहाजी काळे यांनी सलग 8 वर्षे गायन, नृत्य, सवाल जबाब, बतावणी असे कलाप्रकार सादर केले. ’हा डौल मराठीचा’ हा लोककलावर आधारित कार्यक्रम घेऊन पॅरिस, लंडन, अमेरिका, फ्रान्स, इस्त्राईल व मॉरीशस असा परदेश दौरा करून महाराष्ट्रातील लोककला साता समुद्रापार नेली. मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम निर्माते, दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या जन्मशताब्दी निमित्त चित्रपती व्ही. शांताराम हा आगळ्यावेगळ्या अनोख्या कार्यक्रमाची निर्मिती व सादरीकरण केले.
’सोळा हजारात देखणी’ या लावणी कार्यक्रमाची निर्मिती करून महाराष्ट्रातील नाट्यगृहावर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवून लावणीला प्रतिष्ठा, मानसन्मान व गतवैभव प्राप्त करून दिले. ’कशी काय वाट चुकला’, ’सोळा वरिस धोक्याचं’, ’अठरावं वरिस लग्नाचं’, ’बजरंग बली का बकरा’, ’संगीत होनाजी बाळा’, ’लवंगी मिरची कोल्हापूरची’ अशा नाटकांचे शेकडो प्रयोग केले. त्यांनी ’चिमण्यांची शाळा’, ’सख्या सजना’, ’हात लावीन तिथं सोनं’, ’फटाकडी’, ’जिद्द’, ’सवत’, ’झुंज’, ’ठकास महाठक’, ’शापित’, ’स्वराज’, ’मळगंगा देवी’, ’एक उनाड दिवस’ अशा 35 हून अधिक मराठी चित्रपटात विविधरंगी भूमिका साकारल्या. अनंत माने, भालजी पेंढारकर, दत्ता माने, किरण शांताराम, राजा बारगिर, गोविंद कुलकर्णी, दिलीप कोल्हटकर, विजय पाटकर अशा मराठीतील अनेक दिग्गज, दिग्दर्शक तसेच निळू फुले, मनोरमा वागळे, लता अरूण, अशोक सराफ , मोहन गोखले, सुहास भालेकर, रमेश देव, सीमा देव, लीला गांधी, राज शेखर, वसंत शिंदे, उषा किरण, यशवंत दत्त, प्रकाश इनामदार, विजू खोटे, डॉ. श्रीराम लागू, रविंद्र महाजनी, उषा चव्हाण, जयश्री गडकर, आत्माराम भेंडे, धुमाळ, राघवेंद्र कडकोळ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले व मराठी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.

No comments:

Post a Comment