महापौर पदासाठी फिल्डिंग ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

महापौर पदासाठी फिल्डिंग !

 महापौर पदासाठी फिल्डिंग !

महापालिकेकडून निवडणूक प्रस्ताव तयार... आ. सग्राम जगतापांची भूमिका निर्णायक ठरणार?

जून अखेरीस विद्यमान महापौरांचा कार्यकाळ समाप्त.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापौर बाबासाहेब वाकळे यांचा महापौरपदाचा कार्यकाळ जून अखेर समाप्त होणार असल्यामुळे महापौर निवडणुकीसाठी महापालिकेकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. राज्यात सध्या महाविकासआघाडीची सत्ता असली तरी शहरातील राष्ट्रवादी,, शिवसेना  व काँग्रेसमध्ये अजूनही मनोमिलन झाले नसल्यामुळे आगामी महापौर राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा की काँग्रेसचा असेल हे स्पष्ट झाले नसले तरी आ संग्राम जगताप हे या निवडणुकीतील किंगमेकरची भूमिका पार पाडणार यात शंका नाही. आगामी महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीनही पक्षांकडे उमेदवार आहेत परंतु भाजपाकडे उमेदवार नसल्यामुळे या तीन पक्षांपैकी एका महिला उमेदवाराच्या गळ्यात महापौरपदाची माळ पाडणार आहे.
सध्या महापालिकेत शिवसेना-23, राष्ट्रवादी -19 भाजपा- 15 काँग्रेस- 5 बसपा-4 अपक्ष -1 एक जागा रिक्त असे बलाबल असून भाजपा व राष्ट्रवादी युतीचे बहुमत असले तरी महाविकास आघाडीच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने लक्ष घातले तर समीकरणे बदलू शकतात. शिवसेना-राष्ट्रवादी असे समीकरण जुळविण्यात आ.संग्राम जगताप अनुकूल होण्याची शक्यता कमी असल्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येऊन काँग्रेसचा ही महापौर होण्याची शक्यता आहे.
आगामी महापौर शिवसेनेचाच असेल अशी ग्वाही शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेत्यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेना नगरसेवकांना दिली होती. सध्या पालिकेत शिवसेनाच मोठा पक्ष असताना शिवसेनेचा महापौर होऊ शकला नाही ही खंत शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये असल्यामुळे शिवसेना या  निवडणुकीत महापौर पदासाठी दावेदार आहे. पण राज्यस्तरीय शिवसेना नेते यामध्ये कशाप्रकारे भूमिका घेतील. यावरच शिवसेनेच्या महापौर पदाचे गणित अवलंबून राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून सौ रुपाली पारग,े शिवसेनेकडून सौ रोहिणी शेंडगे व सौ रिता भाकरे, काँग्रेसकडून सौ शीला चव्हाण महापौरपदासाठी इच्छुक असून या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या कोरोनाचा शहरात प्रादुर्भाव असून निवडणुकीच्या काळातही लाँकडाऊन चालूच राहिला तर ही निवडणूक ऑनलाईन पार पाडण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे भारतीय जनता पक्षाकडे असून आगामी महापौर पदाच्या निवडणुकीत उपमहापौरपद भाजपाकडे राहील की अन्य पक्षाकडे जाईल या दृष्टीने ही चर्चा सुरू असून उपमहापौरपदासाठीही काही नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समजते.

राज्यातील शिवसेना नेत्यांनी आगामी महापौर निवडणुकीत शिवसेनेचा महापौर होईल असा शब्द दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीची युती असल्यामुळे शिवसेना नेत्यांचा आदेश आघाडीतील घटक पक्षांना मानावा लागेल. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचाच महापौर होणार आहे.
- दिलीप सातपुते, शहर प्रमुख शिवसेना

आ संग्राम जगताप राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेणार असून आ. जगताप जो निर्णय घेतील तो आम्ही पाळणार आहोत. महापौर राष्ट्रवादीचाच असेल अशी आशा आहे.
- संपत बारस्कर, गटनेते, राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते

महापौरपदासाठी अनुसूचित जाती महिला उमेदवार भाजपाकडे नाहीये. महापौर बाबासाहेब वाकळे, शहर भाजपा जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे जो निर्णय घेतील तो भाजपा नगरसेवकांना मान्य राहील.
- मालनताई ढोणे, उपमहापौर

आगामी महापौर पदासाठी काँग्रेस पक्षाकडे सौ शीला चव्हाण या अनुभवी उमेदवार असून पक्षश्रेष्ठीेकडे आम्ही त्यांचे नाव सुचविले आहे. महाविकासआघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आघाडी धर्माचे पालन करून काँग्रेसचा महापौर निवडून आणण्याचा प्रयत्न करावा
- सौ. सुप्रिया जाधवे, गटनेत्या काँग्रेस पक्ष

No comments:

Post a Comment