पोलीस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 14, 2021

पोलीस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित

 पोलीस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित

माजी सैनिक खून प्रकरणात हलगर्जीपणा...

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथील माजी सैनिक मच्छिंद्र फुंदे यांच्या खून प्रकरणात आरोपींना अटक करण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पाथर्डी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड व पोलिस कर्मचारी शिवनाथ बडे यांना निलंबित केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. माजी सैनिक फुंदे यांच्या खुनाची घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड व पोलीस कर्मचारी बडे यांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचे चौकशीत पुढे आले आहे.त्यामुळे त्याची पोलिस अधीक्षक पाटील यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित राठोड व बडे यांना निलंबित करण्यात आले आहे.
पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथे 6 एप्रिल रोजी हॉटेलसमोर गाडी उभी करण्याच्या कारणातून माजी सैनिक मच्छिंद्र कारभारी फुंदे यांना पाच गुंडांनी मारहाण केली होती. त्यांना जबरदस्तीने गाडीत बसून पाथर्डी येथे आणत पुन्हा मारहाण केली होती. या घटनेनंतर फुंदे हे पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले होते. तेथे मात्र पोलिसांनी त्यांना ताटकळत बसून ठेवले. त्यांची तातडीने फिर्याद दाखल करून घेतली नाही. अखेर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना फुंदे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, फुंदे यांना मारहाण करणार्‍या सुधीर संभाजी सिरसाठ (वय 26, रा. आसरानगर, पाथर्डी), आकाश पांडुरंग वारे (वय 24, रा. शिक्षक कॉलनी पाथर्डी), आकाश मोहन डुकरे (वय 21, रा.विजयनगर पाथर्डी), गणेश सोन्याबापू जाधव (वय 23, रा. शंकरनगर पाथर्डी) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. या गुन्ह्यात मात्र पाथर्डी पोलिसांनी हलगर्जी केल्याने, पोलीस अधीक्षक पाटील यांनी दोषींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

No comments:

Post a Comment