आ.लंके यांचे साधे घर व कोव्हीड सेंटर पाहून वसमतचे आमदार थक्क ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 21, 2021

आ.लंके यांचे साधे घर व कोव्हीड सेंटर पाहून वसमतचे आमदार थक्क !

 आ.लंके यांचे साधे घर व कोव्हीड सेंटर पाहून वसमतचे आमदार थक्क !

आ.लंके यांचे काम लोकहितवादी !

५१ हजारांची मदतही दिली!



नगरी दवंडी

पारनेर  प्रतिनिधी 

जगभराला ग्रासलेल्या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी सहकाऱ्याच्या माध्यमातून उभारलेल्या १ हजार १०० बेडच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीराची चर्चा राज्यभर आहे.  आपल्या सहकाऱ्याने हाती घेतलेले हे काम पाहण्यासाठी वसमत जि.  हिंगोली येथील राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांनी बुधवारी भाळवणी येथे येउन कोव्हीड सेंटरला भेट देत तेथील सुविधांची पाहणी केली. साध्या घरात राहणारा हा सामान्य माणूस दुसरीकडे आपल्या जनतेसाठी इतके मोठे कोव्हीड सेंटर उभे करतो हेच कौतुकास्पद आहे, आ. लंके यांचे काम लोकहितवादी असल्याचे सांगत आपण हे सर्व पाहून थक्क झाल्याची प्रतिक्रीया आ. नवघरे यांनी दिली. 

बुधवारी सकाळी आ. नवघरे  हे आ. लंके यांच्या घरी हंगे येथे पोहचले. घरी पोहचल्यानंतर त्यांचे साधे घर पाहून आ. नवघरे यांना अश्‍चर्याचा धक्काच बसला. लंके कुटूंबियांनी त्यांचा सन्मान केला. आ. लंके यांच्यासमवेत जेवण करून आ. नवघरे यांनी हंगे येथे राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आ. लंके यांच्यासमवेत भाळवणी येथील कोव्हीड सेंटरला भेट दिली. तेथे रूग्णांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा पाहून ते आवाक झाले. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दररोज सकाळी अंडी, दुपारी मिष्ठान्न तर रात्रीच्या वेळी मांसाहारी जेवण,रूग्णांच्या मनोरंजानासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, पिण्यासाठी मिनरल वॉटर आदी सुविधा पाहून आपण थक्क झालो आहोत, कसे करता हे सगळे ? असा प्रश्‍न त्यानी उपस्थित केला. त्यावर सहकारी कार्यकर्त्यांच्या जोरावर हे सगळे सुरळीत सुरू आहे, मी निमित्तमात्र आहे. मी दोन पाउले पुढे टाकली की सहकारी पुढचे सर्व आपोआप पार पाडतात असे आ. लंके यांनी सांगितले. 

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आ. नवघरे म्हणाले, शहरातील या विषाणूने आज खेडयापाडयातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत विळखा घातला आहे. मी देखील तिन रूग्णवाहिकांच्या मदतीने कोरोना बाधितांना शहरापर्यंत पोहचविण्याचे काम हाती घेतले आहे. येथे मात्र मतदारसंघातच रूग्णांना सुविधा मिळत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे. या संकटातून आपण लवकरच बाहेर पडू अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आ. लंके यांनी हाती घेतलेल्या या महान कामासाठी ५१ हजार रूपयांची मदत आपण देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, अ‍ॅड. राहूल झावरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment