वयाच्या 18 व्या वर्षी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान करणारे अनंत कान्हेरे ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 17, 2021

वयाच्या 18 व्या वर्षी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान करणारे अनंत कान्हेरे !

 वयाच्या 18 व्या वर्षी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान करणारे अनंत कान्हेरे !

अनंत कान्हेरे यांचा 19 एप्रिल या दिवशी असलेल्या बलीदानदिनानिमित्त लेख


संभाजीनगर
(औरंगाबाद) येथे शिक्षण घेत असतांना क्रांतीकार्याची शपथ घेणार्या अनंतरावांनी देशभक्तांचा छळ करणारा नाशिकचा क्रूर इंग्रज जिल्हाधिकारी जॅक्सन याला संगीत शारदा या नाटकाच्या प्रयोगाला आलेला असतांना गोळ्या घातल्या. या प्रकरणी त्यांना ठाणे कारागृहात फाशी दिली गेली. वयाच्या 18 व्या वर्षी देशासाठी हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी आपल्या प्राणांचे बलीदान दिले.
जन्म - कोकणातील एक युवक माध्यमिक शिक्षणासाठी संभाजीनगरला (औरंगाबादला) जातो काय, तेथे क्रांतीकार्यात भाग घेतो काय, त्याच्या हातात स्वा. सावरकरांनी लंडनहून पाठवलेले पिस्तुल पडते काय आणि तो एका कपटी आणि उच्चपदस्थ इंग्रजाचा वध करतो काय, सारेच अतक्र्य आणि अशक्य ! पण हे अशक्य कृत्य शक्य करून दाखवणार्या युवकाचे नाव होते, अनंत लक्ष्मण कान्हेरे !
अनंतरावांचा जन्म 1891 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी-मेटे या गावी झाला. इंग्रजी शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे औरंगाबादला गेले. काही वर्षांनी ते गंगाराम मारवाडी यांच्याकडे भाड्याची खोली घेऊन राहू लागले. नाशिकच्या स्वातंत्र्यवादी गुप्त संस्थेच्या काशीनाथ टोणपे यांनी गंगाराम आणि अनंतराव यांना गुप्त संस्थेची शपथ दिली. मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीच्या घेतलेल्या प्रतिशोधानंतर अनंतरावही अशा कृतीला अधीर झाले. मग गंगाराम यांनी एकदा अनंतरावांच्या हातावर तापलेला लोखंडी चिमटा ठेवून आणि एकदा पेटलेल्या चिमणीची तापलेली काच दोन्ही हातांनी धरायला सांगून त्यांची परीक्षा घेतली. दोन्हीही दिव्ये करूनही अनंतरावांची मुद्रा निर्विकार होती !
जॅक्सनला ठार मारण्याचा कट रचणे - याच सुमारास नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर आणि ढोंगी अधिकारी होता. त्याने खरे वकील, कीर्तनकार तांबेशास्त्री, बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना कारावासात धाडले होते. अशा अनेक कुकर्मांनीच जॅक्सनने आपला मृत्यूलेख लिहिला. या कामी नियतीनेच अनंतरावांची निवड केली. जॅक्सनला ठार मारण्यासाठी अनंतरावांनी पिस्तुलाच्या नेमबाजीचा सराव केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी जॅक्सनला नीट पाहून घेतले. ‘जॅक्सनला मारल्यावर फाशी जावे लागेल, तेव्हा निदान आई-वडिलांकडे आठवणीसाठी आपले एखादे छायाचित्र असावे’; म्हणून त्यांनी स्वतःचे एक छायाचित्रही काढून घेतले.
जॅक्सनवर चार गोळ्या झाडल्या ! - 21 डिसेंबर 1909 या दिवशी जॅक्सनच्या सन्मानार्थ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर नाटक मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. जॅक्सन दरवाजातून नाट्यगृहात प्रवेश करत असतांनाच आधीच येऊन बसलेल्या अनंतरावांनी जॅक्सनवर गोळी झाडली. ती त्याच्या काखेतून निघून गेली. चपळाई करून अनंतरावांनी जॅक्सनवर समोरून चार गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच कोसळला. अनंतराव शांतपणे आरक्षकांच्या स्वाधीन झाले.
फाशीची शिक्षा - जॅक्सन वधाच्या आरोपाखाली अनंतराव आणि त्यांचे सहकारी अण्णा कर्वे अन् विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा झाली. 19 एप्रिल 1910 या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात सकाळी 7 वाजता हे तीन क्रांतीकारक धीरोदात्त वृत्तीने फाशी गेले. त्यांच्या नातलगांच्या विनंतीला न जुमानता ब्रिटीश सरकारने ठाण्याच्या खाडीकिनारी या तिघांच्याही मृतदेहांना अग्नी दिला आणि त्यांची राखही कोणाला मिळू नये, म्हणून ती राख खाडीच्या पाण्यात फेकून दिली.
वयाच्या 18 व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणार्या हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्यासारख्या अनेकांच्या बलीदानांमुळेच आज आपण स्वतंत्र आहोत. देशप्रेमापोटी क्रांतीकारक प्रसंगी फासावर चढले; आपण किमान स्वदेशी वस्तू तरी वापरुया आणि राष्ट्रजागृती करुया. क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांना विनम्र अभिवादन !

No comments:

Post a Comment