आज रात्री 8 पासून ‘ब्रेक दि चेन’! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, April 14, 2021

आज रात्री 8 पासून ‘ब्रेक दि चेन’!

 आज रात्री 8 पासून ‘ब्रेक दि चेन’!

संचारबंदी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत 15 दिवसांची ‘संचारबंदी’ सुरू होतेय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

काल रात्री ठाकरे यांनी ‘लॉकडाऊन’ या शब्दाचा वापर न करता काल संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर करून एकप्रकारे कडक लॉकडाऊन जाहीर केला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ठाकरे लॉकडाऊन लावणार पण तो 8 दिवसांचा की 15 दिवसांचा, याची चर्चा सुरू होती. लॉकडाऊन लागणार याचा सारासार विचार करूनच काल नागरिकांनी बाजारपेठा बंद असल्या तरी विविध मार्गांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून ठेवली. किराणा दुकानदारांनी ‘लॉकडाऊन’ म्हणजे एक़ संधीच चालून आल्याने अनेक वस्तूंची वाढीव दराने विक्री केली असल्याचे दिसून आले.
राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी मिनी लॉकडाऊन, विकेंड लॉकडाऊन करूनही नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. रेमडीसिव्हीरचा काळाबाजार सुरू आहे. अमरधाममधील धग अजून धुमसतच आहे. काल दिवसभरात 41 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रुग्णसंख्या व मृत्यूचा दर कमी व्हायला तयार नाही. आज रात्री आठ वाजल्यापासून जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे, कोरोना रुग्णांना बेडस् उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहणार आहे. पोलिस प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. ते नागरिकांना घराबाहेर पडू न देण्याचे, रात्री 8 नंतर घरातच राहून नागरिकांनीही जिल्ह्यात वाढत असणारी कोरोनाची चेन तोडण्याची आवश्यकता आहे. आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू होईल. पंढरपूर इथे निवडणुकीनंतर निर्बंध लागू होतील. सकाळी 7 ते रात्री 8 अति आवश्यक सेवा सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक बंद होणार नाही.ट्रेन, बस सुरू होणार. जीवनावश्यक सोयीसुविधा देणारा कर्मचारी वृंदांची येजा नीट व्हावी यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहील.अत्यावश्यक सेवा वगळता इतर सार्वजनिक आस्थापने बंद राहणार. हॉटेल आणि रेस्टॉरंटना पूर्वीचेच निर्बंध लागू असतील. पार्सल किचन सुरू राहतील.

सुरू ः हॉस्पिटलं, डायग्नोस्टिक सेंटर्स, क्लिनिक्स, व्हॅक्सिनेशन, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मसी, फार्मसिटकल कंपन्या, हेल्थ सर्व्हिस, उत्पादन यंत्रणा आणि त्याची वाहतूक करणार्‍या यंत्रणा,दवाखाने, विमा, औषधं, औषधी सेवा डिलर, लस उत्पादन कारखाने, लस वाहतूक वाहनं, वैद्यकीय कच्चा माल वाहतूक. जनावरांशी संबंधित- कृषीची जनावरं, पाळीव प्राणी, वेअरहाऊसिंग, पावसाळ्याची कामं करण्यासाठीचा कर्मचारी, रिझर्व्ह बँक, सेबी, ईकॉमर्स, अधिस्वीकृती धारक पत्रकार, पेट्रोल पंप, कार्गो सेवा, सुरक्षामंडळं,किराणा, दूध, भाजीपाला दुकानं, कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस. विविध देशांचे दूतावास कार्यालयं, रिझर्व्ह बँक आणि सेबीप्रमाणित कार्यालयं ,टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित यंत्रणा तसंच मालवाहतूक, पाणीपुरवठा यंत्रणा,कृषीक्षेत्राशी निगडीत खतं, बियाणं, उपकरणं, दुरुस्ती, आयात-निर्यात यंत्रणा. ईकॉमर्स यंत्रणा. डेटा सेंटर्स, क्लाऊड सर्व्हिसेस, आयटी यंत्रणा सुरू राहतील. सरकारी आणि खाजगी सुरक्षायंत्रणा, इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा यंत्रणा. एटीएम, पोस्ट सेवा, बंदरं, परवानाधारक औषधं आणि फार्मा उत्पादनांची वाहतूक करणाऱी वाहनं, वर्तमानपत्र प्रकाशन व वितरण.

बंद ः सिनेमागृहं, नाट्यगृहं आणि सभागृहं, अम्यूजमेंट पार्क, आर्केड, व्हीडिओ गेम पार्लर, वॉटर पार्क, क्लब, स्विमिंग पूल, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, चित्रपट, मालिका, जाहिरातीचं चित्रीकरण, दुकानं, मॉल, शॉपिंग सेंटर्स, समुद्रकिनारे, बगीचे, खुल्या जागा, धार्मिक केंद्र, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, शाळा, महाविद्यालयं  दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सवलत, सर्व प्रकारचे खाजगी क्लासेस, कोणत्याही स्वरुपाचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम, लग्नाला केवळ 25 जणांच्या उपस्थितीला परवानगी, अंत्यविधीला केवळ 20 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी.

जिल्हा प्रशासनाकडून 24 ु 7 कंट्रोल रूम कार्यान्वित
जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता  24 ु 7 कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या निर्देशानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून  त्याचा दूरध्वनी क्रमांक 0241-2345460  असा आहे. या कंट्रोल रुमसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रीमती उर्मिला पाटील यांची तर सहाय्यक अधिकारी म्हणून जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी दिली आहे. नागरीकांनी जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती मिळणेकरीता सदर कंट्रोल रुमशी संपर्क साधावा. सदर कंट्रोल रुम 24 द7 सुरु राहील, असे कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here