मेहेरबाबा ट्रस्ट कामगारांना जगणे झाले अवघड.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

मेहेरबाबा ट्रस्ट कामगारांना जगणे झाले अवघड..

 मेहेरबाबा ट्रस्ट कामगारांना जगणे झाले अवघड..

पगारवाढीसाठी अन्नत्याग सत्याग्रह !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पगारवाढीच्या कराराची मुदत संपून एक वर्ष होत असताना देखील अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कामगारांच्या पगारवाढी प्रश्नी तोडगा निघत नसल्याने लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने कामगारांनी वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरु केले. पगारवाढीचा प्रश्न निकाली निघत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे.  पगारवाढ न देणार्‍या अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या आडमुठ्या भूमिकेचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला.
अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, कमी वेतन असल्याने कामगारांना महागाईच्या काळात जगणे देखील अवघड झाले आहे. कामगार बाबांच्या श्रध्देपोटी अनेक दिवसापासून सेवा देत असून, महागाईमुळे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येत नाही. मेहेरबाबा ट्रस्टचे 120 कोटी रुपयाने बॅलेन्स शीट असताना, कोरोना काळात ट्रस्टने कोट्यावधी रुपयाच्या जमीनीचे खरेदी व्यवहार केले. मात्र कामगारांच्या पगारवाढीसाठी त्यांनी कोरोनामुळे आर्थिक अडचण असल्याचा मुद्दा उपस्थित करणे चुकीचे आहे. ट्रस्टने कामगारांना परवडेल अशी पगारवाढ देऊ करुन हा प्रश्न सोडविण्याचे त्यांनी सांगितले.
युनिट अध्यक्ष सतीश पवार यांनी कामागारांप्रती सहानुभूतीपुर्वक विचार करण्याची गरज असून, पगारवाढ प्रश्नी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सात तारखा होऊन देखील प्रश्न सुटत नाही. ट्रस्टच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा वाद चिघळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे म्हणाले की, इतर धार्मिक संस्थांच्या तुलनेत मेहेरबाबा ट्रस्टमधील कामगारांना अत्यंत कमी वेतन आहे. किमान उदरनिर्वाह होईल एवढे वेतन कामगारांना मिळणे आवश्यक असून, या न्याय, हक्काच्या मागणीसाठी हे आंदोलन असल्याचे त्यांनी सांगितले.
 या आंदोलनात लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष लांडे, युनिट अध्यक्ष सतीश पवार, संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, प्रविण भिंगारदिवे आदींसह कामगार सहभागी झाले होते.
अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च 2020 मध्ये संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे. कोरोना महामारीचे व इतर कारण पुढे करुन ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. सदर प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी सात ते आठ तारखा झाल्या. यापैकी मोजक्या तारखांना विश्वस्तांनी हजेरी लावून कामगारांना दरमहा एक हजार चारशे पहिल्या वर्षीसाठी, दुसर्या वर्षी दोन हजार आठशे व तीसर्या वर्षी चार हजार दोनशे अशा टप्प्याटप्यांनी वाढ देण्यास सहमती दर्शवली. मात्र कामगारांना अत्यंत कमी पगार असल्याने महागाईच्या काळात ही पगारवाढ परवडणारी नसल्याने कामगारांनी ट्रस्टचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

No comments:

Post a Comment