चुकीच्या माहितीमुळे क्रीडापटूंनी गोंधळून न जाण्याचे आवाहन... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

चुकीच्या माहितीमुळे क्रीडापटूंनी गोंधळून न जाण्याचे आवाहन...

 चुकीच्या माहितीमुळे क्रीडापटूंनी गोंधळून न जाण्याचे आवाहन...

“खेलो इंडिया”साठी काँग्रेस प्रयत्न करणार

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात येणार्‍या खेलो इंडिया सेंटरसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या समावेश करण्यात यावा या मागणीसाठी नगर शहर काँग्रेस क्रीडा विभागाच्या वतीने राज्याचे क्रीडा मंत्री ना. सुनील केदार यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती काँग्रेस क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय खेळाडू प्रवीणभैय्या गीते पाटील यांनी दिली आहे. काँग्रेस क्रीडा विभागाच्या शिष्टमंडळाने जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांची किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा अध्यक्ष प्रवीण गीते यांच्या पुढाकारातून या विषयाबाबत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
   याबाबत माहिती देताना किरण काळे म्हणाले की, मुळात अद्याप कोणत्याही जिल्ह्याची अंतिम निवड करण्यात आलेली नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने ऑक्टोबर महिन्यामध्ये कबड्डी, धनुर्विद्या, बॉक्सिंग, जलतरण, ज्युडो या खेळांसाठीचे प्रस्ताव पाठविले आहेत. तर डिसेंबर महिन्यामध्ये वॉलीबॉल, कुस्ती या दोन खेळांचे प्रस्ताव केंद्राकडे सेंटर मिळावे या दृष्टीने पाठवले आहेत. हे दोन्ही प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीने पाठवण्यात आले असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये देशातील केवळ शंभर जिल्ह्यांना एक ते दोन सेंटर्स देण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने या योजनेचा विस्तार केला जाणार असून पुढील पाच वर्षांमध्ये देशभरात 1000 सेंटर्स सुरू करण्याचा केंद्राचा मानस आहे. आज रोजी केवळ प्रस्तावांची पडताळणी सुरू असून त्रुटींची पूर्तता केली जात आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला डावलले गेले ही बातमी चुकीची असून याबाबत कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असे काळे यावेळी म्हणाले.
   यावेळी काँग्रेस क्रीडा विभागाचे उपाध्यक्ष प्रदीप पाटोळे, सचिव मुकुंद नेवसे, खजिनदार नारायण कराळे, मच्छिंद्र साळुंखे,  उत्कर्ष झावरे आदी उपस्थित होते.
   काँग्रेस क्रीडा विभागाचे गणेश ठोंबरे, शेख आलम, नागनाथ धूपधरे, शशिकांत घाडगे, ऋषिकेश चितळकर, निखिल गलांडे, ओम जगताप, शिवराज कर्डिले, गणेश पठारे, प्रजक्ता नलावडे, प्रियांका शिरसाठ, प्रसाद पाटोळे,अदिल सय्यद आदींसह क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने या वेळी झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते. खेलो इंडियाची 23 जिल्ह्यांची महाराष्ट्रातील यादी प्रसिद्ध झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. या यादीमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा समावेश नसल्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला डावलण्यात आल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस क्रीडा विभागाने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यातून खरी माहिती समोर आली आहे. काँग्रेस क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांनी शहर व जिल्ह्यातील क्रीडापटूंना आवाहन केले आहे की त्यांनी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवत गोंधळून जाऊ नये. नगरला न्याय मिळावा यासाठी किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री ना. सुनील केदार, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले जाणार आहेत. नगरला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस क्रीडा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here