‘स्थायी’ सभापती अविनाश घुलेंनी केला पाणीपुरवठ्याचा अभ्यास.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

‘स्थायी’ सभापती अविनाश घुलेंनी केला पाणीपुरवठ्याचा अभ्यास..

 ‘स्थायी’ सभापती अविनाश घुलेंनी केला पाणीपुरवठ्याचा अभ्यास..

पाणी मुबलक पण, नियोजनाचा अभाव
  मुळा धरणातून जुन्या व नवीन अशा दोन पाणी योजनांव्दारे 99 एमएलडी पाणी उपसा होतो. यापैकी विळदघाट येथील उपकेंद्रात 95 एमएलडी पाणी पोहोचते. तेथे पाण्यावर प्रक्रिया होऊन 100 एमएलडी जलवाहिनीव्दारे बाहेर पडते. यापैकी 29 एमएलडी पाणी नागापूर उपकेंद्रात तर उर्वरित 71 एमएलडी पाणी वसंत टेकडीसाठी येते. वसंत टेकडी येथे येणारे पाणी मोजले असता, 57 एमएलडी एवढे पाणी वसंत टेकडी येथे पाहोचते. तेथून शहराला वितरित होते. शासनाच्या नियमानुसार एका व्यक्तीला प्रतिदिन 135 लीटर पाणी द्यायचे झाल्यास 67 एमएलडी पाणी अवश्रुत आहे. त्यापैकी 57 एमएलडी पाणी वसंत टेकडी येथे उपलब्ध होते. याचा अर्थ दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी हे पाणी पुरेसे आहे. परंतु, महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, वसंत टेकडी येथून हे पाणी जाते कुठे, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यातही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. सभापती घुले यांच्यासह पथकाने ज्या मुळा धरणातून पाणीउपसा होतो, तिथे भेट देऊन यंत्राव्दारे पाणी तपासणी केली.
   मुळा धरणातून शहराला दररोज पाणीपुरवठा करू शकतो इतके 57 एमएलडी म्हणजे 5 कोटी 70 लाख लीटर पाणी दररोज उपलब्ध होत असल्याचे वास्तव काल केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. त्यामुळे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होण्यास पाणी योजना नव्हे तर महापालिकेचा पाणीपुरवठा विभागच जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
   मुळा धरणातून पुरेसे पाणी येत नाही, त्यामुळे शहराला दिवसाआड पाणीपुवठा करावा लागत असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून आजवर सांगितले गेले. परंतु, मुळा धरणातून पाणी योजनेव्दारे शहराला दररोज पाणीपुरवठा करता येईल एवढे पाणी उपलब्ध होत असल्याचे समोर आल्याने मनपाचा पाणीपुरवठा विभाग चांगलाच तोंडघशी पडला आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाणी योजनेवरून विळद, देहरे, आणि शिंगवे गावाला 24 तास पाणीपुरवठा सुरू आहे. ही गावे पाणीपट्टी मात्र भरत नाहीत. चोवीस तास पाणी देऊन ग्रामपंचायती पाणीपट्टी भरत नसल्याचेही यावेळी समोर आले.
   शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यातही अनेक भागांमध्ये पुरेसे पाणी मिळत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दोन पाणी योजना असूनही पाणी कुठे मुरते, याचा शोध घेण्यासाठी मुळा धरण, विळदघाट आणि वसंत टेकडी अशा तिन्ही ठिकाणी उपलब्ध होणार्‍या पाण्याचे मोजमाप करण्यात आले. या तिन्ही ठिकाणी उपलब्ध होणार्‍या आकड्यांवर नजर टाकल्यास मुळा धरणातून वसंत टेकडी येथे पुरेसे पाणी पोहोचते. शहराला दररोज पाणीपुरवठा करू शकू इतके पाणी उपलब्ध होते. परंतु, नगरकरांना दिवसाआडच पाणीपुरवठा होत असून, या पाण्याचा शोध घेऊन नगरकरांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन स्थायीचे सभापती अविनाश घुले यांनी दिले आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाणी योजनेव्दारे मिळणार्‍या पाण्याचे खासगी यंत्रणेमार्फत मोजमाप करण्यात आले. यावेळी महापालिका स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्यासह नगरसेवक गणेश भोसले, माजी नगरसेवक निखील वारे, आयुक्त शंकर गोरे, जल अभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment