भाजपा नेते सीताराम गायकर राष्ट्रवादीच्या तंबूत! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

भाजपा नेते सीताराम गायकर राष्ट्रवादीच्या तंबूत!

 भाजपा नेते सीताराम गायकर राष्ट्रवादीच्या तंबूत!

उद्या मुंबईत प्रवेश. मधुकर पिचडांना मोठा धक्का.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्हा बँकेचे संचालक व अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर हे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांना रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात होणार्‍या कार्यक्रमात अगस्ती कारखान्याचे विद्यमान सात संचालक, बाजार समिती व काही संस्थाचे पदााधिकारीही गायकर सोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
गेली पाच वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष गायकर हे तालुक्यात बहुजन समाजाचा चेहरा मानले जातात. जिल्हा बँक निवडणुकीत गायकर हेे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे व पिचड समर्थक म्हणून न राहता ते उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत जावून बिनविरोध निवडूनही आले. मात्र, अनुसूचित जमाती मतदारसंघातील उमेदवार भाजपचे वैभव पिचड यांनाही गायकर सोबत आपणास बिनविरोध निवडून देतील, अशी आशा होती.पण त्यांना आपला अर्ज मागे घ्यावा लागला. राष्ट्रवादीकडून अमित अशोक भांगरे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड होऊन दमदार एन्ट्री झाली. अकोल्याच्या राजकारणात पहिल्यापासून पिचड यांच्या विरोधात भांगरे घराण्याचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत प्रबळ दावेदार मानले जातात.
हा पक्ष प्रवेश जिल्हा बँक निवडणुकीनंतर लगेच घेण्याची गळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घातली होती. पण अगस्ती कारखान्याचा गाळप हंगामावर याचा विपरित परिणाम होऊ नये म्हणून गायकर यांनी हा प्रवेश एक महिन्यापासून लांबणीवर टाकला. मात्र, 25 एप्रिलला अगस्तीच्या गाळप हंगामाचा पट्टा पडणार आहे. त्यामुळे आता हा प्रवेश होणार आहे. अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह 8 संचालक प्रवेश करणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या राजकारणावर तसेच अगस्तीच्या राजकारणावरही गायकर यांचे प्रवेशाने मोठा परिणाम होणार आहे.

No comments:

Post a Comment