काँग्रेसकडुन थोरात, राऊत व वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

काँग्रेसकडुन थोरात, राऊत व वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा

 काँग्रेसकडुन थोरात, राऊत व वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा

काँग्रेसला हवे उपमुख्यमंत्रीपद! शिवसेना अनुकूल; राष्ट्रवादीचं मौन.

मुंबई :
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षबदला बरोबरच ठाकरे सरकारच्या खातेवाटपातही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपद स्वत:कडे ठेवून काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून काँग्रेसमध्ये कुणाच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचं नाव निश्चित केलं आहे.पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रिपदाचीही मागणी केल्याने काँग्रेस समोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेऊन पटोले यांना मंत्रिपद देणं शक्य नव्हतं. त्यामुळे पटोलेंकडील विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला देऊन त्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्याचा तोडगा समोर आला. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर देऊन उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. शिवसेनेनेही त्याला मान्यता दिली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. मात्र, ज्या काँग्रेस नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, त्याचं आताचं खातं पटोले यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाकरे सरकारमधील काँग्रेसच्या विद्यमान मंत्र्यालाच उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. म्हणजे त्याच्याकडील आताचं खातं पटोले यांच्याकडे दिलं जाईल आणि त्यामुळे मंत्रिपदाबाबतची खळखळ होणार नाही, अशा प्रकारची काँग्रेसची रणनीती असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं.उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. तसेच राज्यात सत्ता आणण्यात थोरात यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. शिवाय थोरात हे राज्यातील पक्षाचा चेहरा राहिला आहे. राज्यातील राजकारणावर त्यांची पकड आहे. तसेच नगरमध्ये विखे-पाटलांच्या सत्तेला आव्हान देण्याची धमक थोरात यांच्यात असल्याने त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देऊन पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पक्षाचा बेस वाढवण्यावर काँग्रेसचा भर आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदासाठी थोरात हे सर्वाधिक दावेदार असल्याचं मानलं जात आहे.विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे नावही उपमुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आहे. राऊत हे चर्चेत असलेले मंत्री आहेत. आक्रमक नेते असून काँग्रेसमधील दलित चेहरा आहे. हायकमांडने घेतलेली भूमिका राज्यात जोरकसपणे मांडण्याचं कामही ते करत असतात. राऊत यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देऊन दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. राऊत यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यास केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण राज्यात काँग्रेसला दलित मतांची बेगमी करण्यास फायदा होणार आहे. शिवाय वीज बिल माफीच्या मुद्द्यावरून राऊत यांचं ऊर्जा खातं टीकेचं लक्ष्य ठरलं आहे. त्यामुळे राऊत यांच्याकडून ही जबाबदारी काढल्यास विरोधकांच्या हातातून वीजबिल माफीचा मुद्दाही निघून जाईल. त्यामुळे वीज बिल माफीवरून काँग्रेसची मलिन होणारी प्रतिमा सावरता येईल. त्यासाठीही राऊत यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देण्याचं काँग्रेसमध्ये घटत असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून काँग्रेसमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले मंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाहिले जाते. वडेट्टीवार हे ओबीसी नेते आहेत. आक्रमक आहेत. तसेच स्पष्टवक्ते आहेत. शिवाय विदर्भातून आलेले आहेत. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा असा वाद सुरू आहे. त्यातच ओबीसी जनगणनेची मागणी राष्ट्रीय पातळीवर होत आहे. या मागणीने जोर धरल्यास आगामी काळात ओबीसींची शक्ती एकवटण्याची शक्यता आहे. अशा वेळी या ओबीसी मतदारांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी वडेट्टीवार यांचा पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे ओबीसींना आपल्याकडे वळवण्यासाठी वडेट्टीवार यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन बळ देण्याचं काँग्रेसमध्ये घटत आहे. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद दिल्यास भाजपकडे वाढणारा ओबीसींचा ओघ रोखणं शक्य होणार आहे. त्यासाठीही वडेट्टीवार हे उपमुख्यमंत्रीपदासाठी पक्षनेत्यांची पसंती असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं. उपमुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाणही आहेत. मात्र, त्यांच्या नावाला पक्षातून फारसा पाठिंबा नसल्याचं सांगितलं जातं. अशोक चव्हाण यांच्याकडे आधीच चांगलं खातं आहे. तसेच ते मुख्यमंत्रीपदी राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या ऐवजी इतर चेहर्‍यांना संधी देण्याचं काँग्रेसमध्ये घटत आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांना ठाकरे सरकारमध्ये कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं असं एका गटाला वाटतं. पण मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीबाबा उपमुख्यमंत्रीपद घेण्यास उत्सुक नसल्याचं बोललं जात आहे.

No comments:

Post a Comment