जेऊरमध्ये महावितरण कंपनीच्या कृषी योजनेविषयी मार्गदर्शन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

जेऊरमध्ये महावितरण कंपनीच्या कृषी योजनेविषयी मार्गदर्शन

 जेऊरमध्ये महावितरण कंपनीच्या कृषी योजनेविषयी मार्गदर्शन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील जेऊर येथे मंगळवार दि. 16 रोजी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशीतील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीदरम्यान उपकार्यकारी अभियंता यांनी महावितरणच्या वतीने शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येत असलेल्या कृषी योजना 2020 विषयी नागरिकांना मार्गदर्शन केले. कृषी योजनेअंतर्गत वीज देयकात सवलत, नवीन वीज जोड, नवीन रोहित्र तसेच रोहित्रांची क्षमता वाढवून देणे या बाबींची सविस्तर माहिती सांगितली. सदर योजना शेतकरी हिताची असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कोपनर यांनी केले.
यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जेऊर येथील महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी मांडल्या. बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून रोहित्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शेतकर्‍यांना समजल्यानंतर शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता रोहित्र बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. कर्मचार्‍यांच्या वाढत्या तक्रारी पाहून उपकार्यकारी अभियंता कोपनर यांनी कर्मचार्‍यांनाही व्यवस्थित काम करण्याबाबत सक्त ताकीद दिली.
     जेऊर कार्यालयातील कनिष्ठ अभियंता डी. सी. सोनटक्के यांची बदली करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. बदली करण्याबाबत अनेक दिवसांपासून ग्रामस्थ मागणी करत असून त्याची दखल न घेतल्याने महावितरण कंपनीच्या कार्यालयात आमरण उपोषण करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तसेच महावितरण चे जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.यावेळी उपसरपंच श्रीतेश पवार, माजी सरपंच मधुकर मगर, विकास कोथिंबिरे, बंडू पवार, भाजप तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे, अण्णासाहेब मगर, बाबासाहेब मगर, दत्ता डोकडे, संजय येवले, गोविंद जरे, आप्पा बनकर, पद्माकर शेटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महावितरण कंपनीला थकीत बिलांची वसुली करण्यासाठी पंचक्रोशीतील समन्वय समिती मदत करणार असल्याचे समन्वय समितीच्या वतीने राजेंद्र दारकुंडे यांनी सांगितले.

ना.तनपुरे यांचा निषेध
शेतकर्‍यांना वीज बिल माफ करण्यात आले नाही तसेच महावितरण कंपनीकडून वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नाराज झालेल्या शेतकर्‍यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांचा निषेध व्यक्त केला.

कर्मचार्‍यांचे वेतन कपात
जेऊर महावितरण कार्यालयातील कर्मचारी कृषी योजनेची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरले. तसेच कामात हलगर्जीपणा पणा केल्याच्या कारणावरून उपकार्यकारी अभियंता कोपनर यांनी कार्यालयातील तंत्रज्ञ व इतर दोषी कर्मचार्‍यांचे 15 दिवसांचे वेतन कपात करण्या बाबत आदेश दिले आहेत.


No comments:

Post a Comment