हळदी-कुंकू समारंभास धार्मिक व अध्यात्मिक महत्त्व ः सुरेखा विद्ये - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

हळदी-कुंकू समारंभास धार्मिक व अध्यात्मिक महत्त्व ः सुरेखा विद्ये

 हळदी-कुंकू समारंभास धार्मिक व अध्यात्मिक महत्त्व ः सुरेखा विद्ये

पद्मशाली महिला शक्तीच्यावतीने महिलांच्या हस्ते श्री मार्कंडेय मंदिरात महाआरती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगरच्या गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिरात मार्कंडेय जयंती उत्सव भाविकांच्या उपस्थितीत व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पद्मशाली युवा शक्ती (ट्रस्ट) अंतर्गत पद्मशाली महिला शक्तीच्या वतीने समाजातील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
हळदी-कुंकू समारंभाची सुरुवात महिलांच्या हस्ते भगवान श्री मार्कंडेय यांची महाआरती करून झाली. कार्यक्रम आयोजनात सुरेखाताई विद्ये, नीता बल्लाळ, सारिका सिद्दम, लक्ष्मी म्याना, कविता भारताल, वैशाली बोडखे, जयश्री म्याना, उमा कुरापाटी यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी बोलताना सुरेखा विद्ये म्हणाल्या की, हिंदू समाजात हळदी-कुंकू समारंभाला खूप महत्व आहे. धार्मिक व अध्यात्मिकदृष्ट्या हा समारंभ साजरा केला जातो. हा समारंभ सुवासिनी महिला एकत्रित येऊन साजरा करतात. सद्य परिस्थितीत अशा समारंभात विधवा महिलांना सहभागी करून घेतले जात आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. हळदी-कुंकू समारंभात विवाहित स्त्रिया एकमेकींच्या कपाळावर हळदी-कुंकू लावतात. मराठी संस्कृतीत हळदी-कुंकू हे विवाहित स्त्रीचे प्रतीक मानले जाते. हा समारंभ मकर संक्रांतीबरोबरच इतर सणाच्या वेळीही केला जातो. विवाहित स्त्री घरी आल्यानंतर यजमान स्त्री तिला हळदी-कुंकू लावून निरोप देते, असे त्या म्हणाल्या.
लक्ष्मी म्याना म्हणाल्या की, हळदी कुंकू समारंभास अध्मात्मिक महत्व आहे. या समारंभाच्या माध्यमातून सुवासिनीच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीची हळद-कुंकू लावून पूजा केली जाते. याप्रकारे ब्रह्मांडातील आदिशक्तीच्मा सुप्त लहरींना जागृत होण्यासाठी आवाहन केले जाते आणि एकमेकांमधील देवत्वाची पूजा केली जाते. हा समारंभ विवाहित स्त्रिया एकमेकींना हळदी-कुंकू लावून पतीच्या दीर्घायुष्यासाठी एकमेकींना शुभेच्छा देण्याचे प्रतीक आहे.
पद्मशाली महिला शक्तीने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शहरातील विविध भागातून या समारंभास उपस्थित झालेल्या महिलांनी कार्यक्रम आयोजनाबद्दल विशेष धन्यवाद दिले.

No comments:

Post a Comment