आर्थिक विकास महामंडळाची 2000 ते 2009 पर्यंतची कर्ज माफ करावे ः होले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

आर्थिक विकास महामंडळाची 2000 ते 2009 पर्यंतची कर्ज माफ करावे ः होले

 आर्थिक विकास महामंडळाची 2000 ते 2009 पर्यंतची कर्ज माफ करावे ः होले


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्रातील दुर्बल घटकातील लोकांसाठी सर्व आर्थिक विकास महामंडळाने सन 2000 ते 2009 या कालावधीत दिलेली सर्व कर्ज माफ करण्याची व केलेल्या कर्ज माफीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी आर्थिक विकास महामंडळ कर्जदार मुक्ती कृती समितीच्या वतीने ओबीसी चळवळीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. भानुदास होले यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र सरकारने सन 2000 ते 2009 या कालावधीतील सर्व आर्थिक विकास महामंडळाचे अंदाजे 900 कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा सन 2009 मध्ये केली होती. अशा प्रकारचे निवेदन विधानसभेमध्ये अर्थमंत्र्यांनी सादर केले व त्याची अंमलबजावणी केली जाईल असेही सांगितले होते. याकरिता माजी खासदार प्रकाश आंबेडकर व ओबीसी चळवळीचे नेते अशोक सोनवणे यांनी पुढाकार घेऊन मुंबई येथील आझाद मैदान येथे सुमारे एक लाख लोकांचा मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा करून सर्व आर्थिक विकास महामंडळाचे 900 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले होते. असे असतानाही सध्या आर्थिक विकास महामंडळाची कर्जवसुली तहसीलदार यांच्या मार्फत सुरु आहे. याबाबत वसुली नोटिसा काढून शेतीवर बोजा टाकण्याचे काम चालू असल्याचे काही प्रकरणांवरुन दिसून येते. तसेच कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचेही काम तलाठी यांच्यामार्फत केले जात असल्याने कर्जदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकारी अधिकारी करीत असल्याचा आरोप कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने सन 2000 ते 2009 या कालावधीत 900 कोटीचे कर्ज माफ केले असे जाहीर करावे व कर्ज धारकांच्या घर, जमिनी, जंगम मालमत्ता यांवरील बोजा कमी करण्याचे आदेश देण्याची मागणी आर्थिक विकास महामंडळ कर्जदार मुक्ती कृती समितीच्या वतीने कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. भानुदास होले, भाऊसाहेब पुंड, मारुती रेवजी गाडेकर, मेजर नारायण चिपाडे, अ‍ॅड. महेश शिंदे यांनी केली आहे. आठ दिवसांमध्ये आर्थिक विकास महामंडळाचे सर्व कर्ज माफ न झाल्यास कृती समितीच्या वतीने सर्व कर्जदार आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment