घरातील ओल्या सुका कचर्‍यावर 700 स्क्वेर फुटात तीनशे झाडांची फुलवली टेरेसबाग - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

घरातील ओल्या सुका कचर्‍यावर 700 स्क्वेर फुटात तीनशे झाडांची फुलवली टेरेसबाग

 घरातील ओल्या सुका कचर्‍यावर 700 स्क्वेर फुटात तीनशे झाडांची फुलवली टेरेसबाग


कर्जत :
लॉक डाऊनचा वापर करून कर्जत मधील सौ सुवर्णा सचिन पोटरे यांनी आपल्या टेरेस वरील अवघ्या सातशे स्वेअर फुटात तीनशे विविध प्रकारच्या झाडांचे संगोपन करत टेरेस गार्डन केले असून गेली एका वर्षात त्याला चांगलाच बहर आला असून स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत त्यांनी आपल्या घरातील ओला व सुका कचरा वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करत त्यावर ही बाग फुलविली असल्याने त्यास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सदर उपक्रमाला नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी भेट दिली व या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.
सौ सुवर्णा सचिन पोटरे यांना पूर्वीपासून झाडांची आवड होतीच लॉक डाऊन च्या काळात त्यास अधिकच गती मिळाली व युट्युब बघता बघता एक एक झाड वाढू लागले, सध्या त्याच्या या टेरेस गार्डन मध्ये 300 विविध प्रकारची झाडे आहेत यामध्ये आंबा, चिकू, सिताफळ, संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, अंजीर इत्यादी फळांची झाडे असून भाज्यांमध्ये कारले, आळूची पाने, मेथी, शेपू,  पालक, वांगी, टमाटे, काकडी, हादग्याची फुले, वाल, तांदूळसा, चिघळची भाजी, दुर्मिळ व औषधी अशी पाथरीची भाजी तसेच औषधी वनस्पती मध्ये कृष्णतुळस, रान तुळस, गवती चहा, पुदिना, पानफुटी, शोभेच्या झाडांमध्ये विविध रंगी गुलाब, रानचाफा, सोनचाफा, मोगरा, सर्व प्रकारच्या रेनलिली, विविध प्रकारचे जास्वंद, शेवंती, चिनी रातराणी, तागडा, निशिगंध, गुलाब, गोकर्ण, सदाफुली, कागदी फुले अशी विविध फुलांची झाडे व रोपे आहेत. यामध्ये पिंपळ, कडुनिंब, व इतर फळांच्या झाडांवर बोन्साय चा प्रयोग चालू आहे. या टेरेस गार्डनचे अनेक फायदे पोटरे कुटुंबाला होत असून विविध ऋतूंमध्ये ही फळे खायला मिळत आहेत.
रोज रासायनिक खतांचा वापर करून मिळत असलेल्या भाज्या व फळ यापासून थोडीफार का होईना सुटका मिळत आहे.  टेरेस वरच्या बागेत रोज अनेक प्रकारचे पक्षी येत असून या पक्षांना पाणी आणि धान्य खाण्यासाठी ठेवल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊन उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची सोय होत आहे. तसेच याच गार्डनमध्ये मधमाशांचं पोळ तयार झाले असून या मधमाशांचा मुळे नैसर्गिकरित्या परागीकरण होऊन फुलांची संख्या ही वाढत आहे.
सध्या कर्जत शहर स्वच्छ होत आहे सुंदर होत आहे यामध्ये आम्ही ही नकळत हातभार लावत आहोत कारण आमच्या घरातील कसलाच कचरा आम्ही घराबाहेर जाऊ देत नाहीत तर घरातील ओला कचरा सुका कचरा यावर प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करत आहोत.  सर्व झाडांना व रोपांना या सेंद्रिय खतांमुळे त्याची चांगली  व पौष्टिक वाढ होऊन त्याच्या पासून सेंन्द्रिय फळे व भाज्या खायला आम्हाला मिळत आहेत.  कर्जत शहरातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या दारात, मोकळ्या जागेत किंवा टेरेस वर अशा पद्धतीने गार्डन करून  माझा कचरा..माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत शहराला स्वछता अभियानात अव्वल स्थान मिळण्यासाठी आपलं योगदान दिले पाहिजे असे मत सौ.सुवर्णा सचिन पोटरे यांनी व्यक्त केले आहे. कर्जत शहरात अनेक नागरिक गेली अनेक महिन्यापासून नियमित श्रमदान करत स्वच्छता अभियान राबवत आहेत त्याच्या कार्याला तोड नाही पण आम्हीही याद्वारे त्यांना साथ देण्याचे छोटेसे कार्य करत आहोत असे मत ही पोटरे यांनी व्यक्त केले.आगामी काळात घरात सोलर लाईट, रेंनवाटर हार्वेस्टिंग करून घराला वेगळं रूप देण्याचा मानस आहे असे सचिन पोटरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment