बेलापुरातील चिंच व्यापार्‍यांची सतर्कता; चोवीस हजाराचा लिलाव सव्वा दोन लाखात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

बेलापुरातील चिंच व्यापार्‍यांची सतर्कता; चोवीस हजाराचा लिलाव सव्वा दोन लाखात

 बेलापुरातील चिंच व्यापार्‍यांची सतर्कता; चोवीस हजाराचा लिलाव सव्वा दोन लाखात

श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे पितळ उघडे !

नगरी दवंडी/प्रतिनिधी
बेलापूर ः येथील चिंच फळ व्यापार्‍यांच्या सतर्कतेमुळे श्रीरामपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांचे पितळ अखेर उघडे पडले आहे. या अधिकार्यांनी मर्जीतल्या व्यापार्यांना निरोप देत कोल्हार ते बेलपिंपळगाव दरम्यानचा हा लिलाव गुपचुप उरकला होता.  
याबाबतची सविस्तर हकिगत अशी, कोल्हार ते बेलपिंपळगाव दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतीत चिंचेची 50 हून आधिक झाडे आहेत. दरवर्षी या झाडावरील फळांची विक्री ही  लिलाव पद्धतीने करून करण्यात येते. मात्र कोरोंना काळात या कार्यालयातील काही अधिकारी आणि सोकावलेल्या इतर काही कामगारांनी आपल्या मर्जीतील दोन - चार व्यापार्यांना बोलाऊन लाखो रूपयांचा हा लिलाव अवघ्या काही हजारात देऊन आपले हात ओले केले होते.
लिलाव होण्याअगोदर ईच्छुक अनेक व्यापार्यांनी लिलावासंदर्भात विचारपूस करण्यासाठी या कार्यालयात हेलपाटे मारले. मात्र अधिकार्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन त्यांना हुसकावले. मात्र काही व्यापर्यांना ही फळे काढताना दिसले, आणि व्यापार्यांचे पित्त खवळले.
यानंतर व्यापार्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री हसन मुश्रीफ, संगमनेरचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसिलदार प्रशांत पाटील पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके आदिना निवेदने देत सदरील चिंच फळाच्या लिलाव प्रक्रियेत सर्व व्यापार्यांना सामावून घेत लिलाव घ्यावा अन्यथा उपोषणा सारख्या मार्गाचा अवलंब करण्यात येईल, असा इशारा मुनीर बागवान, निसार बागवान, जाकीर हुसेन बागवान, राजू शिंदे, द्रोणा थोरात, रईस बागवान, युनूस बागवान, कय्युम बागवान, हुसेन बागवान, हसन बागवान, राजेंद्र शिक्रे, रविंद्र गायकवाड, हमीद आतार, शफीक बागवान, रियाज आतार, कासम बागवान, शाहरुख बागवान यांच्यासह इतर सुमारे 25 व्यापार्यांनी दिला होता.
निवेदने हाती पडताच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कामगार खडबडून जागे झाले. आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार लिलाव घेण्यात आला. अगोदर अवघ्या 24 हजारात दिलेला हा लिलाव सुमारे सव्वा दोन लाख रुपयात गेला आणि येथील व्यापार्यांन्नी दाखवलेली जागृतता आणि सतर्कतेमुळे या अधिकार्यांचे पितळ शेवटी उघडे पडले.  
दरम्यान, लिलावावेळी काही व्यापार्यांनी व्हीडीओ चित्रण करण्याचा प्रयत्न केला असता यावरून
सार्वजनिक बांधकाम खात्यातील काही अधिकारी- कामगार आणि व्यापार्यांमद्धे बाचाबाची झाली. व्हीडीओ चित्रण करू नका, असा आग्रह अधिकार्यांनी धरला. अधिकार्यांनी व्यापार्यांचे मोबाइल हिसकवण्याचा प्रकार केला. मात्र व्यापर्यांच्या एकजुटीपुढे त्यांना नमते घ्यावे लागले. या प्रकाराची सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

No comments:

Post a Comment