ग्राहकांचे प्रश्न संवाद आणि समन्वयातून सोडवणे ही ग्राहक पंचायतीची प्रभावी कार्यपद्धती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 17, 2021

ग्राहकांचे प्रश्न संवाद आणि समन्वयातून सोडवणे ही ग्राहक पंचायतीची प्रभावी कार्यपद्धती

 ग्राहकांचे प्रश्न संवाद आणि समन्वयातून सोडवणे ही ग्राहक पंचायतीची प्रभावी कार्यपद्धती

ग्राहक पंचायतीचे नाशिक विभाग संघटक संजय शुक्ल यांचे प्रतिपादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ग्राहकांचे प्रश्न जाणून घेऊन संवाद आणि समन्वयातूनच प्रश्न सोडवणे ही ग्राहक पंचायतीची  प्रभावी कार्यपद्धती आहे असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे नाशिक विभाग संघटक संजय शुक्ल (जळगाव) यांनी व्यक्त केले. श्री. शुक्ल यांनी ग्राहक पंचायतीच्या अहमदनगर शाखेला नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर होते.
   यावेळी संजय शुक्ल यांनी अहमदनगरच्या ग्राहक पंचायतीच्या सदस्यांची व  कार्याची ओळख करून घेतली. तक्रारदाराने लेखी तक्रार अर्ज करणे, त्याची समस्या समजावून घेणे, आणि त्याच्या प्रश्नांचे, समस्यांचे निराकरण करणे या प्रक्रियेत ग्राहक पंचायतीची विशिष्ट कार्यपद्धती व त्या मागची भूमिका त्यांनी विशद केली. प्रशासनातील अधिकार्‍यांशी योग्य संवाद आणि समन्वय साधला तर प्रश्नांची सोडवणूक जलद गतीने व सहज होते हे त्यांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदुमाधव जोशी यांनी मांडलेला विचार व भूमिका ही काळाच्या कसोटीवर उतरलेली कार्यपद्धती आहे, असे सांगून बिंदुमाधव जोशी यांच्या आठवणींना श्री. शुक्ल यांनी उजाळा दिला. ग्राहक पंचायतीच्या नगर जिल्ह्याचा आढावा घेऊन जिल्ह्यात सुरू असलेल्या कार्याबद्दल श्री. शुक्ल यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
   प्रारंभी जिल्हा संघटक शब्बीर शेख यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा सहसंघटक प्रा. डॉ. राजेंद्र कळमकर यांनी जिल्ह्याच्या कार्याचा आढावा सादर केला. जिल्हा अध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर यांनी आगामी काळातील जिल्हा व शहरातील कार्याची रूपरेषा व नियोजन यांचा विस्तृत आढावा विभाग संघटक श्री. शुक्ल यांच्या समोर मांडला. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा महिला विभाग प्रमुख सौ. मोहिनी कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य नरेश पांडव, जयंत देशपांडे, स्वामी मुळे आदींनी सहभाग घेतला. यावेळी विभाग संघटक श्री. संजय शुक्ल यांचा जिल्हा अध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. राजेंद्र कळमकर यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here