तालुक्यातील वीज चोरी थांबवण्यासाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

तालुक्यातील वीज चोरी थांबवण्यासाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा...

 तालुक्यातील वीज चोरी थांबवण्यासाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा...


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर: तालुक्यातील सुपे,भाळवणी औद्योगिक वसाहतीसह मोठे व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर वीज चोरी करतात.या वीज चोरीमुळे वीज वितरण कंपनीला होणारा तोटा सर्वसामान्यांकडून अधिभाराच्या स्वरूपात वसूल केला जातो.सर्वसामान्य वीज ग्राहकांची ही एक प्रकारची लूट आहे.ही लूट थांबवण्यासाठी तालुक्यातील वीज चोरीला आळा घालावा अन्यथा पारनेर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष वसिम राजे यांनी दिला आहे.या संदर्भात वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत अडभाई यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सनी थोरात, संदीप नगरे, रियाज राजे, अविनाश औटी आदी उपस्थित होते.
            निवेदनात म्हटले आहे की,सुपे,भाळवणी येथील औद्योगिक वसाहतीत अनेक उद्योजक मोठ्या प्रमाणावर वीज चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.तालुक्यातील काही बडे व्यावसायीकही मोठ्या प्रमाणावर वीज चोरी करीत असल्याच्या तक्रारी वीज वितरण कंपनीकडे करण्यात आलेल्या आहेत.वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वीज चोरी होत असल्याने या तक्रारींची दखल घेतली जात नाही.वीज चोरीमुळे वीज वितरण कंपनीला होणारा तोटा सर्वसामान्यांकडून अधिभाराच्या स्वरूपात वसूल केला जातो.हा सर्वसामान्यांन, घरगुती वीज ग्राहकांवर होणारा अन्याय आहे.एकीकडे उद्योजक,बडे व्यावसायीक वीज चोरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नफा कमावतात तर दुसरीकडे सर्वसामान्यांना अधिभाराच्या स्वरूपात भुर्दंड सहन करावा लागतो.सर्वसामांन्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी तालुक्यातील उद्योजक,बड्या व्यवसायीकांकडून होणाऱ्या वीज चोरीला आळा घालावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
         उद्योजक, बडे व्यावसायीक यांच्याकडे वीज वितरण कंपनीची कोट्यावधी रुपयांची थकबाकी असताना त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत टाळाटाळ केली जाते दुसरीकडे शेतीपंपाच्या वीज बिल वसूलीसाठी रोहित्रांची वीज खंडित केली जाते हा भेदभाव खपवून घेतला जाणार नाही.वीज वितरण कंपनीच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी उप कार्यकारी अभियंता प्रशांत अडभाई यांच्याशी चर्चा करताना दिला आहे.

No comments:

Post a Comment