मुळा धरणातून रब्बी हंगामासाठी 15 जानेवारीपासून आवर्तन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 25, 2020

मुळा धरणातून रब्बी हंगामासाठी 15 जानेवारीपासून आवर्तन

 मुळा धरणातून रब्बी हंगामासाठी 15 जानेवारीपासून आवर्तन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

राहुरी ः मुळा धरणातून सिंचनासाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन 15 जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला . रब्बीसाठी एक तर उन्हाळी हंगामात दोन आवर्तनांवर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
       पालकमंत्री हसन मूूूश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कालवा सल्लागार समितीची बैठक नगरला झाली . जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी , अधीक्षक अभियंता अलका अहिरराव , मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील , आमदार मोनिका राजळे , माजी आमदार पांडुरंग अभंग व कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते . जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अन्य बैठकीत व्यस्त असल्याने त्यांना जलसंपदा अधिकार्‍यांनी बैठकीतील आवर्तनाच्या नियोजनाची माहिती दिली .
      मुळा धरणात पिण्याचे व औद्योगिक वापराचे आरक्षित पाणी , तसेच बाष्पीभवन व (डेड स्टोक ) मृत साठा वगळता 14 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे . धरणाच्या उजव्या - डाव्या कालव्यांद्वारे रब्बीत एक व उन्हाळी हंगामात दोन आवर्तनांचे नियोजन जलसंपदा विभागाने केलेआहे .
उजव्या कालव्याचे प्रत्येक आवर्तन 40 दिवस चालेल . राहुरी , नेवासे , पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील 30 हजार हेक्टरचे सिंचन होईल . उजव्या कालव्यातून रब्बीसाठी चार हजार दशलक्ष घनफूट व उन्हाळी दोन आवर्तनांसाठी 9 हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल . डाव्या कालव्याचे आवर्तन 20 ते 25 दिवसांचे असेल . राहुरी तालुक्यातील तीन हजार हेक्टरचे सिंचन होईल . डाव्या कालव्यातून रब्बीसाठी 500 दशलक्ष घनफूट व उन्हाळी दोन आवर्तनांसाठी एक हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल . संभाव्य तारखा या रब्बी हंगामासाठी 15 जानेवारी ते 24 फेब्रुवारी तर उन्हाळी हंगामासाठी 10 मार्च ते 19 एप्रिल 10 मे ते 18 जून अशा रहाण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment