ही मालिका टीआरपी अभावी बंद पडणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

ही मालिका टीआरपी अभावी बंद पडणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  ही मालिका टीआरपी अभावी बंद पडणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  


नगरी दवंडी/प्रतिनिधी

  सोनी मराठी वाहिनीवरील सावित्रीजोती ही सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चरित्र मालिका टीआरपी अभावी बंद होणार असल्याचे वर्तमान पत्रात वाचले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी  महाराष्ट्रात महापुरुषांच्या मालिकेला पुरेसे प्रेक्षक मिळत नाही यासारखे महाराष्ट्राचे दुसरे दुर्दैव नसेल. सोनी मराठी वाहिनीवर चालू असलेली सावित्रीजोती अत्यंत दर्जेदार अशी मालिका आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी दर्जेदार अभिनय केला असून संवाद, चित्रीकरण, पात्रे सर्वच अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित ही दीर्घ मालिका पहिल्यांदाच मराठी वाहिनीवर दाखवण्यात येत आहे याबद्दल सोनी मराठी वाहिनीचे कौतुकच करावे लागेल. या मालिकेत आजवर सावित्रीबाई व महात्मा जोतीरावांच्या  पहिल्या तीस वर्षातील जीवनकार्य व विचार यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पुढील भागांत त्यांच्या महत्वपूर्ण समाजक्रांतीच्या उपक्रमांचे योगदान दाखवण्यात येणार होते पण पुरेशा प्रेक्षकांअभावी आता  अर्ध्यावरच ही बंद करण्यात येणार आहे.  देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी मानव जातीसाठी त्यातही स्त्री जातीसाठी जे कार्य केले आहे त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उभ्या आहेत. असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात स्त्रिया पुरुषांपेक्षा मागे आहेत। पंतप्रधान, राष्ट्रपती यासारखी देशाचे सर्वोच्च पद देखील स्त्रियांनी भोगले आहे. हे सर्व फुले दाम्पत्यांमुळेच घडले आहे. ज्या फुले दाम्पत्याने महिलांना साक्षर करण्यासाठी बहुजन वर्गाला त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले, त्यासाठी अतोनात हाल सोसले  त्याच बहुजन वर्गाला आणि स्त्रियांना त्यांच्या जीवनावरील मालिका पाहायला वेळ नाही. सावित्रीजोती मालिका पाहण्याऐवजी आजच्या स्त्रिया सासू सुनांचे भांडण, विवाहबाह्य संबंध यासारखे निरर्थक विषय असलेल्या मालिका पाहतात. ज्या महापुरुषांमुळे आपल्याला माणूस  जगायला मिळते. आज आपण जे आहोत ते केवळ या महापुरुषांमुळेच आहोत याचा विसर बहुजन समाजाला पडला आहे. सवित्रीजोती मालिकेपेक्षा   बुवा, बापू यांच्या अंधश्रद्धा पसरवणार्‍यांना मालिकांना जास्त टीआरपी मिळतो हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी शोभणीय नाही. आज धकाधकीच्या जीवनात महापुरुषांवरील पुस्तके वाचायला सर्वांन वेळ मिळत नाही अशा वेळी महापुरुषांचे जीवनचरित्र आणि विचार समजून घेण्यासाठी अशा मालिकांची गरज पडते. या मालिका पाहून महापुरुषांचे चरित्र व विचार समजून घेण्यास मदत होते. महापुरुषांनी  समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती मिळते. नव्या पिढीला त्यांचे विचार समजतात.  या मालिका पाहणार्‍या किशोरवयीन मुलामुलींवर चांगले संस्कार होतात म्हणून या मालिका दाखवायलाच हव्यात.  सावित्रीजोती मालिका बंद होता कामा नये प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रतिसाद दयायला हवा. शासनानेही ही मालिका बंद पडू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. 

No comments:

Post a Comment