मागासवर्गीय कुटुंबियांच्या घरावर प्राणघातक हल्ला करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

मागासवर्गीय कुटुंबियांच्या घरावर प्राणघातक हल्ला करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा

 मागासवर्गीय कुटुंबियांच्या घरावर प्राणघातक हल्ला करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) ची मागणी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः निर्मलनगर येथील शिरसाठ मळ्यातील अलंकापुरी कॉलनीत राहत असलेल्या मागासवर्गीय (मातंग) कुटुंबीयाच्या घरावर प्राणघातक हल्ला करणार्यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, मंदा ठोकळ, संदीप ठोकळ, गौरव घोरपडे आदिंसह पिडीत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
निर्मलनगर येथील अलंकापुरी कॉलनीत मंदा अरुण ठोकळ अनेक वर्षापासून राहत आहे. या भागात एकच मागसवर्गीय (मातंग) समाजाचे घर आहे. मंगळवार दि.15 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता ठोकळ कुटुंबीयांच्या घरावर दिपक सावंत, तुषार थोरवे, गजानन सावंत आदिंसह आठ ते दहा व्यक्तींच्या टोळक्यांनी जीवघेणा हल्ला केला. काही वर्षापासून सदर आरोपी व त्यांच्या मित्रांनी ठोकळ कुटुंबीयांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे काम सातत्याने केले आहे. सदर भागांमध्ये खालच्या मागासवर्गीय जातीच्या लोकांनी शांत राहायचे, इतर कुठलाही कार्यक्रम घ्यायचा नाही, असे सांगितले. सदर मागासवर्गीय एकच कुटुंब असल्याने ते घाबरून शांत बसले. परंतु मंगळवारी ठोकळ कुटुंबीयांच्या घरी बारशाचा कार्यक्रम सुरु असताना सदर आरोपींनी सुरु असलेला कार्यक्रम बंद करण्यासाठी शिवीगाळ करुन धमकावले. कार्यक्रम बंद न केल्याचा राग धरुन ठोकळ कुटुंबीयांवर लाठी-काठी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला.
सदर प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये ठोकळ कुटुंबीयांच्या सदस्यांना मारहाण करुन घराचे नुकसान केले. तर वाहने जाळण्यात आली. यामध्ये अरुण ठोकळ हे या घटनेत गंभीर जखमी झाले असून, एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. सदर प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण कुटुंब या घटनेमुळे भयभीत झाले असून, दहशतीचे वातावरण आहे. हा प्रकार जातीयद्वेषातून घडला असला असून देखील पोलीसांनी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करुन घेतला नाही. सदर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आरपीआय व पिडीत कुटुंबीयांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment