महापौर, आयुक्तांचे बैठकीनंतर मनोज कोतकरांचे उपोषण मागे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

महापौर, आयुक्तांचे बैठकीनंतर मनोज कोतकरांचे उपोषण मागे.

 महापौर, आयुक्तांचे बैठकीनंतर मनोज कोतकरांचे उपोषण मागे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  महापालिकेतील विद्युत विभागप्रमुख म्हणून उपअभियंता वैभव जोशी यांना तत्काळ हजर होण्याचा आदेश आयुक्तांनी दिल्याने सभापती मनोज कोतकर यांनी काल सायंकाळी उपोषण मागे घेतले. शहरातील बंद पडलेले विद्युत दिवे सुरू करण्याच्या कोतकर यांच्या मागणीवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिले आहे. कोतकरांच्या उपोषणामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा विद्युत विभाग अभियंत्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
विद्युत विभाग प्रमुख पद गेल्या दिवाळीपासून रिक्त आहे. त्यामुळे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी स्मार्ट एलईडी प्रकल्प रखडला आहे. शहरातील अनेक दिवे बंद आहेत. त्यामुळे स्मार्ट एलईडी प्रकल्प सुरू करणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी निविदाही प्राप्त झालेली आहे; परंतु विद्युत विभाग प्रमुख नसल्याने हा प्रस्ताव सादर झाला नाही. आयुक्त मायकलवार यांनी विद्युत विभाग प्रमुख म्हणून जोशी यांची नियुक्ती केली होती; मात्र हे हजर झाले नव्हते. कोतकर यांच्या उपोषणानंतर जोशी यांना हजर होण्याचा आदेश देण्यात आला असून, हा प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
शहरातील सर्व प्रभागातील बंद पडलेले विद्युत दिवे सुरू करावेत, यासह विद्युत विभागासाठी पूर्णवेळ अभियंत्यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी स्थायी समिती सभापती कोतकर यांनी काल दुपारी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणात नगरसेवक असिफ सुल्तान, माजी नगरसेक निखिल वारे, बाळासाहेब पवार, अजय चितळे, संजय ढोणे, सतीश शिंदे आदींचा समावेश होता.यावेळी शहरातील विद्युत सुरू झालेच पाहिजेत, पूर्णवेळ अभियंत्यांची नियुक्ती न करणार्‍या प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देत नगरसेवकांनी महापालिका कार्यालय दणाणून सोडले. उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी सभापतींची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली; मात्र सभापती कोतकर हे उपोषणावर ठाम होते. आयुक्त श्रीकांत मायकलवार हे दालनात उपस्थित नव्हते. सभापती कोतकर दिवसभर आयुक्त दालनाच्या प्रवेशद्वारात फर्शीवर ठाण मांडून होते. नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. दरम्यान, सायंकाळी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह आयुक्त मायकलवार यांनी कोतकर यांची भेट घेऊन चर्चा केली. आयुक्तांच्या दालनात बैठक होऊन उपअभियंता जोशी यांना विद्युत विभागप्रमुख म्हणून तत्काळ हजर होण्याचा आदेश देण्यात आला. या बैठकीनंतर कोतकर यांनी उपोषण मागे घेतले.

No comments:

Post a Comment