मनोविकारांवरील सर्व सेवा एकाच ठिकाणी देणारे मानसग्राम देशाची नवी प्रेरणा- डॉ. भरत वटवानी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

मनोविकारांवरील सर्व सेवा एकाच ठिकाणी देणारे मानसग्राम देशाची नवी प्रेरणा- डॉ. भरत वटवानी

 मनोविकारांवरील सर्व सेवा एकाच ठिकाणी देणारे मानसग्राम देशाची नवी प्रेरणा- डॉ. भरत वटवानी


नगरी दवंडी/प्रतिनिधी                                                                                                                         
अहमदनगर ः   नियोजित मानसग्राम प्रकल्पामुळे भारतात प्रथमच मनोविकारांवरील सर्व सेवा एकाच ठिकाणी आणि मोफत मिळणार आहेत.निकोप मन:स्वास्थ्य, हाच भारतनिर्माणाचा पाया असल्याने या प्रकल्पात सहभागी होताना देशसेवेची पवित्र अनुभूती येते,असे प्रतिपादन डॉ. भरत वटवानी यांनी येथे केले.मनोरुग्णांच्या तृणमूल सेवेबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ.भरत वटवानी यांच्या हस्ते मानसग्राम प्रकल्पाचे भूमिपूजन आणि यातील मनोयात्रींसाठीच्या   स्नेहाश्रद्धा प्रकल्पाचे लोकार्पण नुकतेच झाले. मानसग्राम मधील 4 हजार चौरस फुटांच्या स्नेहाश्रद्धा  संकुलात रस्त्यांवरील बेघर बेवारस  मनोयात्रींसाठीचे उपचार आणि कौटुंबिक पुनर्घटन करणारे केंद्र सुरू करण्यात आले.यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, पंजाब सरकारचे कमिशनर ऑफ स्टेट टॅक्सेस निळकंठ आव्हाड , मुंबईतील गरीबांचे नेत्रतज्ञ प्रभात फाऊंडेशनचे डॉक्टर प्रशांत थोरात, जीवनाचे सर्व संचित सामाजिक उपक्रमांना सहयोग म्हणून देणारे सौ. पुष्पलता आणि श्री सर्जेराव तापकीर दांपत्य, डॉ प्रकाश शेठ ,प्रकल्पाचे मानद संचालक डॉ. नीरज आणि सौ.दीप्ती करंदीकर, पत्रकार भूषण देशमुख, मनोयात्रींसाठी चिखली ( जिल्हा बुलढाणा ) येथील सेवासंकल्प संस्थेचे सौ. आरती आणि नंदू पालवे, आदी  उपस्थित  होते.अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते दिवंगत डॉ.जयंत करंदीकर यांच्या स्मरणार्थ मनोबल व्यसनमुक्ती केंद्र, पुष्पलता सर्जेराव तापकीर पुरस्कृत पुष्पलता मनोयात्री भवन, स्किझोफ्रेनिया आणि इतर मानसिक समस्यांवर समुपदेशन, मानसोपचार आणि पुनर्वसन केंद्र ,प्रज्ञा मानस केंद्र, आदी नियोजित उपक्रमांचा मानसग्राम मध्ये समावेश आहे.प्रास्ताविकात डॉ.सुहास घुले यांनी नमूद केले की, डॉ. वटवानी यांच्या श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनने आजवर 10  हजारांवर बेघर-बेवारस मनोरुग्णांना उपचार देऊन त्यांच्या घरी आणि समाजात पुन:स्थापित केले आहे. त्यामुळे अनामप्रेम , स्नेहालय , स्पंदन समुपदेशन केंद्र, सौ दिप्ती आणि डॉक्टर नीरज करंदीकर यांचे करंदीकर मानसोपचार रुग्णालय, या सर्वांनी डॉ.स्मिता आणि भरत वटवानी यांच्या नेतृत्वाखाली मानसग्राम उभारण्याचा संकल्प केला आहे .यासंदर्भात डॉक्टर नीरज करंदीकर यांनी सांगितले की भारतात सुमारे 19 कोटी लोकांना मानसिक उपचारांची गरज आहे .परंतु यातील 82 टक्के रुग्णांना कोणतेही उपचार मिळत नाहीत. रस्त्यांवरील बेवारस लोकांत निम्म्याहून अधिक मनोरुग्ण आहेत. भारत मानसिक रोगांच्या संदर्भात ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहे. या स्थितीत सामाजिक दायित्व ओळखून या प्रकल्पात करंदीकर मानसोपचार रुग्णालय सहभागी झाले आहे. स्पंदन समुपदेशन केंद्राच्या दीपा नींलेगावकर यांनी नमूद केले की, भारतातील सुमारे 589 जिल्ह्यात एकही  मानसोपचार तज्ञ नाही. वाढती व्यसनाधीनता आणि विविध आजारांमुळे या क्षेत्रात सामाजिक संस्था कार्यकर्ते रुग्णालय आणि वैद्यकीय व्यवसायिक यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता  आहे. मानसग्राम प्रकल्प या क्षेत्रातील सर्व सामाजिक संस्था, कार्यकर्ते, मानसोपचार तज्ञ, रुग्णालये यांना जोडत समाजासाठी समाजासोबत कार्यरत राहणार असल्याचे प्रकल्पाच्या  समन्वयक सुलक्षणा आहेर यांनी सांगितले. मानसग्राम चे मार्गदर्शक अजित कुलकर्णी यांनी सांगितले की, आरंभी रस्त्यांवरील बेवारस मनोरुग्णांना उपचार घेऊन घरी पाठवण्याचे प्रयत्न येथे स्नेहाश्रद्धा प्रकल्प करील. संयोजक अनिता अजित माने आणि वैजनाथ लोहार यांनी मनोयात्रींसाठीच्या हेल्पलाईन चा 7038205872  हा क्रमांक यावेळी  जाहीर  केला. अजित माने, अनिल गावडे ,हनीफ शेख , प्रवीण मुत्याल यांनी उपस्थितांना हिम्मत ग्राम, आधारग्राम आणि सत्यमेव जयते ग्राम  येथील उपक्रम आणि रोजगारक्षम सेवांची तपशीलवार माहिती दिली. स्नेहाश्रद्धा प्रकल्पातील वास्तूवर वारली चित्र चितारणार्‍या अरविंद कुडिया  आणि त्याच्या भिंगार मधील 8 कलाकार विद्यार्थ्यांचा यावेळी डॉक्टर वटवानी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्नेहालय मधील विद्यार्थीही या चित्रणात सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment